Success Story : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. मात्र देशात शेती क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी अधिक पाहायला मिळते. शेतीमधील कामे ही पुरुषच अधिक जबाबदारीने करतात असा समज आहे. मात्र आता हा न्यूनगंड मोडीत काढला जात आहे.
आता महिलांनी देखील शेती क्षेत्रात चांगली प्रगती साधली आहे. महिला आता शेतीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. केवळ शेतीमधील कामेच करतात असे नाही तर शेती व्यवसायातून महिला आता चांगली कमाई करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सासु-सुनेच्या एका जोडीने देखील शेती व्यवसायात महिलांच्या कर्तुत्वाची छाप सोडली आहे. जिल्ह्यातील मौजे पापरी येथील वर्षा टेकळे यांनी आपल्या सासूच्या जोडीने खडकाळ माळरानावर डाळिंब शेती फुलवून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. या कामी वर्षा यांना त्यांच्या पतीचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे.
हे पण वाचा :- विविध शेती कामे करण्यासाठी ‘हा’ ट्रॅक्टर ठरणार वरदान ! किंमतही आहे परवडणारी, वाचा….
खरं पाहता सोलापूर जिल्हा हा डाळिंब उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीतून चांगली आर्थिक प्रगती साधली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले डाळिंब चक्क सातासमुद्रापार निर्यात करण्यात आले आहेत.
दरम्यान पापरी येथील वर्षा टेकळे आणि त्यांचे पती कुमार टेकळे तसेच त्यांच्या सासूबाई जिजाबाई टेकळे यांनी देखील डाळिंब शेती मधून आर्थिक प्रगती साधली आहे. टेकळे कुटुंबीयांनी खडकाळ माळरानावर डाळिंब लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
या कुटुंबाने आपल्या सहा एकर जमिनीपैकी पाच एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली असून आता यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. विशेष बाब म्हणजे वर्षा टेकळे डाळिंब शेतीमधील सर्व कामे स्वतः करतात. ट्रॅक्टरच्या माध्यमातून कोळपणी, फवारणी यांसारखी कामे ते स्वतः करतात.
जरी सोलापूर जिल्हा डाळिंब उत्पादनासाठी विशेष ओळखला जात असला तरी देखील अलीकडील काळात रोगराईमुळे सोलापूर जिल्ह्यातून डाळिंब बागा नामशेष होत आहेत. मात्र वर्षा यांनी योग्य नियोजन करून डाळिंब बाग जोपासली असून यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.
वर्षा यांनी दिलेल्या माहितीनुसार डाळिंब लागवड केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी डाळिंबाचा बहार धरला. त्यावेळी त्यांना 13 टन माल मिळाला. यासाठी पाच लाखाचा खर्च आला आणि दहा लाख रुपये उत्पन्न त्यांना प्राप्त झाले.
या वर्षी डाळिंब बागेचा दुसरा बहार असून यातून त्यांना 30 टन माल मिळणार आहे. विशेष म्हणजे यातून जवळपास 30 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. निश्चितच डाळिंब शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत या शेतकरी कुटुंबाने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! तलाठी भरती निघाली; 4625 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार, केव्हा होणार परीक्षा? वाचा….