Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहतं ते भयान दुष्काळाचे चित्र. या दुष्काळी भागात शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हानात्मक काम. पोटाची खळगी भरण्यापुरतं देखील उत्पादन घेण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नाकी नऊ येतात. अशा महाभयंकर दुष्काळी भागातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवण्याची किमया उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने साधली आहे.
यामुळे या युवा शेतकऱ्याची सध्या जिल्ह्यात सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील शेतकरी बाप लेकाच्या जोडीने आपल्या पाच एकर शेत जमिनीत स्ट्रॉबेरीची बाग फुलवून लाखों रुपयांची कमाई केली आहे. खरं पाहता स्ट्रॉबेरी हे एक थंड हवामानातील पीक आहे.
मात्र या पिकाची शेती उस्मानाबाद सारख्या उष्ण हवामानात आणि अतिशय कमी पाणी असलेल्या भागात सक्सेसफुल झाली असल्याने सध्या या प्रयोगाची चांगलीच चर्चा होत आहे. जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या मौजे पाथर्डी येथील शिवाजी साखरे व प्रदीप साखरे या बाप लेकाच्या जोडीने हा शेती मधला चमत्कार केला आहे.
या साखरे पिता-पुत्रांनी शेतीमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने आपल्या पाच एकर शेत जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड केली. योग्य नियोजन करून यातून त्यांना चांगले उत्पादन देखील मिळाले आहे. सद्यस्थितीला बाजारात स्ट्रॉबेरीला साडेचारशे रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. यामुळे त्यांना या पाच एकर क्षेत्रातून जवळपास दोन लाखांची कमाई होण्याची आशा आहे.
खरं पाहता उस्मानाबाद जिल्ह्यात कायमच पाण्याची वन वन पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक असा पाऊस होत असल्याने अलीकडे नवनवीन प्रयोग जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. स्ट्रॉबेरी शेतीचा हा प्रयोग देखील अलीकडे पाणी पातळी वाढत असल्याने शेतकरी करू लागले आहेत.
निश्चितच कोरडवाहू समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्याचे चित्र आता हळूहळू बदलू पाहत आहे. केवळ कळंब तालुक्यातील या पिता-पुत्रांनीच नाही तर तुळजापूर तालुक्यातही अलीकडे स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग बहुतांशी शेतकरी करत असल्याचे चित्र आहे.
निश्चितच, ज्या दुष्काळी भागात हजारोंची कमाई करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते त्या ठिकाणी लाखो रुपये कमवून या बापलेकाच्या जोडीने इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे.