भारतामध्ये वंदे भारत ट्रेनच्या निमित्ताने एक वेगळीच क्रांती घडून आली आहे असे म्हटले तरी वागले ठरणार नाही. प्रवाशांना कमीत कमी वेळेमध्ये जास्त अंतर कापण्याकरिता व आरामदायी प्रवास करता यावा याकरिता वंदे भारत ट्रेनचे महत्व अनन्यसाधारण असे आहे.
देशामधील प्रमुख शहरांदरमन वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत असून महाराष्ट्रात देखील बऱ्याच मार्गावरून आता वंदे भारत ट्रेन सुरू केले जात आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता काही दिवसात भारतामध्ये पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सेवेत दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नुकतेच वंदे भारत स्लीपर व्हर्जनचे प्रोटो टाईपच्या मॉडेलचे रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे. वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन यांच्यासोबतच आता वंदे भारत मेट्रो देखील भारतात लवकर सुरू केली जात असून या ट्रेनच्या चाचण्या देखील पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांच्या सेवेसाठी वंदे भारत मेट्रो ट्रेन लवकरच सादर होणार असून त्याचा पहिला मान गुजरात राज्याला मिळाला आहे.
अहमदाबाद ते भुज दरम्यान धावणार पहिली वंदे भारत मेट्रो
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देशातील पहिली वंदे भारत मेट्रो देशाच्या सेवेत येण्यास सज्ज झाली असून गुजरात राज्यातील अहमदाबाद ते भुज या दोन शहरादरम्यान धावणार आहे. इतकेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून या ट्रेनचे वेळापत्रक देखील जारी करण्यात आलेले असून ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार असून ती भुज ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.
कसा असेल या वंदे भारत मेट्रो ट्रेनचा रूट?
ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार असून भूज ते अहमदाबाद दरम्यान धावणारी ही वंदे भारत मेट्रो अंजार, गांधीधाम,बचाऊ, समखिआली, हलवद, विरमगाम, चांदलोडीया आणि साबरमती या स्थानकांवर थांबेल तर अहमदाबादहुन निघालेली वंदे भारत मेट्रो साबरमती, चांदलोडीया, विरमगाम, हलवद, समखियाली,भचावू, गांधीधाम अंजारमार्गे भुजला पोहोचेल.
कसे आहे पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे वेळापत्रक?
पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन भुज स्थानकावरून सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल व सहा तास 45 मिनिटात 60 किमीच्या अंतर कापून सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. तसेच परत येताना ती सायंकाळी 5:30 मिनिटांनी अहमदाबाद स्टेशनवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी भूजला पोहोचेल.
किती आहेत पहिल्या वंदे भारत मेट्रोचे तिकीट दर?
पहिल्या वंदे भारत मेट्रो तिकीटचा कमीत कमी दर 30 रुपये असून पन्नास किलोमीटरचा प्रवास केला तर 60 रुपये इतके शुल्क यासाठी लागणार आहे. प्रवाशांनी जर मासिक पास काढला तर तो देखील या ट्रेनमध्ये वैध असणार आहे. यामध्ये साधारण मेल आणि एक्सप्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी केलेले तिकीट मात्र चालणार नाही.
वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या प्रवासाकरिता एमएसटी तिकीट जारी केले जाणार आहे. साप्ताहिक, मासिक तिकिटाची सुविधा देखील प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवाशांना सात दिवस, पंधरा आणि वीस दिवसांच्या एकेरी प्रवासाचे शुल्क भरावे लागेल.
यामध्ये जर थेट आपण अहमदाबाद ते भुज दरम्यानचे तिकीट दर पाहिले तर ते अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार जर आपण एक अंदाज बांधला तर एकेरी प्रवासाचे मूळ भाडे जीएसटी विरहित 430 रुपये असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कशी असते असते वंदे भारत मेट्रो?
वंदे भारत ट्रेन सारखीच ही वंदे भारत मेट्रो असते. ज्याप्रमाणे उपनगरीय मेट्रो रेल्वेमध्ये वैशिष्ट्ये आणि सोयीसुविधा असतात अगदी त्याच सोयी सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आले आहेत. वंदे भारत मेट्रोच्या दोन्ही साईडला इंजिन असते व स्वयंचलित दरवाजे देखील असतात.
पहिली वंदे भारत मेट्रो ही दहा डब्यांची असणार असून वंदे भारत आणि वंदे मेट्रो ट्रेन यामधील मुख्य फरक असा आहे की, ही वंदे भारत मेट्रो ट्रेन पूर्णपणे अनारक्षित ट्रेन असणार आहे. म्हणजेच ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी काउंटरवरून तिकीट खरेदी करणे प्रवाशांना गरजेचे राहणार आहेत.
वंदे भारत मेट्रो ताशी 130 किमी वेगाने धावू शकते. परंतु मार्ग आणि मार्गाची क्षमता यानुसार हे वंदे भारत मेट्रो ट्रेन ताशी 75 ते 90 किमी प्रति तास वेगाने चालवली जाणार आहे. तसेच ही ट्रेन आपत्कालीन परिस्थिती तातडीने ब्रेक घेत थांबवता देखील येणार आहे. महत्वाचे म्हणजे पॅसेंजर ट्रेन पेक्षा या वंदे भारत मेट्रोचा वेग अधिक असणार आहे.