राहाता येथील श्री नवनाथ मायंबा देव व श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रारंभ..

Published on -

श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे व उत्सव ट्रस्ट, राहाता यांच्या वतीने आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव, श्री नवनाथ (मायंबा) देवाची यात्रा व श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला आज उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. तसेच नवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये हायमॅक्सचे लोकार्पण देखील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी अभिषेक पूजा व सत्यनारायण महापूजेसाठी भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. धार्मिक वातावरणात प्रारंभ झालेल्या या यात्रेदरम्यान, संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या समवेत नृत्य करून सदरील आनंदोत्सवात मोठ्या उत्साहात सहभाग दर्शविला. विशेष म्हणजे सदरील यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हरीकीर्तन, भव्य कुस्ती स्पर्धा, पारंपरिक बैलगाडा शर्यत आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांना परिसरातील भाविक व नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे.

या शुभप्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या तसेच श्री नवनाथ (मायंबा) देव आणि श्री वीरभद्र देवाच्या यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. गावातील परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती जपणारी ही यात्रा सर्व भाविकांसाठी आस्था व भक्तीचा एक महत्त्वपूर्ण सोहळा ठरत असल्याचे मत यावेळी सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

तसेच श्री नवनाथ (मायंबा) देव आणि श्री वीरभद्र महाराज देवस्थानच्या विकासाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे मत डॉ. सुजय विखेंनी मांडले व या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे येथे सर्व जातीधर्माचे लोक एकवटत असतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करून सर्वधर्मसमभावाचा संदेश देत असतात. त्यामुळे या यात्रेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त असल्याचे मत त्यांनी मांडले.

यासोबतच डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, नवनाथ महाराजांच्या यात्रेला आज सुरुवात होत असून राहाताचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांची देखील आज यात्रा आहे, असा सुवर्णयोग बऱ्याच कालावधीनंतर अनुभवायला मिळत आहे. त्यासोबतच परवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव देखील आहे. ही सर्वांसाठी एक अभूतपूर्व पर्वणीच म्हणता येईल असे देखील मत यावेळी सुजय विखे पाटील यांनी मांडले.

दरम्यान बच्चू कडू यांच्या आरोपावर प्रश्न केला असता डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्तर देतेवेळी सांगितले की, ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. त्याला नाकारून चालणार नाही. मात्र, त्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. सदरील कुटुंबांबरोबर संपूर्ण विखे पाटील परिवार आहे. मी स्वतः देखील त्यांच्या परिवाराशी बोललो आहे, भविष्यात मदत लागल्यास विखे पाटील परिवार सदैव त्यांच्यासोबत उभा राहील आणि प्रशासनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात जर कुठे हलगर्जीपणा झाला असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असे आधीच आश्वासन देण्यात आलेले आहे, त्यामुळे निश्चितपणे योग्य ती कारवाई होईल असे सुजय विखेंनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल येथे येऊन अपशब्द बोलणं, हे काय आम्हाला नवीन नाही. वर्षानुवर्ष अनेक लोक आले आणि काही अपशब्द वापरून गेले, परंतु त्याचा मतदार व गोरगरीब जनतेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. कारण जनता नेहमीच खऱ्याच्या बाजूने म्हणजेच विखे पाटील परिवाराच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. मुळात या मतदारसंघात तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठीच विखे पाटील परिवार झटत आहे. त्यामुळे कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. तरी बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत हिच प्रार्थना, असे स्पष्ट करून सुजय विखेंनी बच्चू कडूंच्या टिकेला उत्तर दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News