राज्य शासनाचा शेतकऱ्यांसाठी अजिबोगरीब फर्मान ! जात सांगितली तरच रासायनिक खत मिळणार; काय आहे हा माजरा, वाचा

Ajay Patil
Published:

Agriculture News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नानाविध अशा अडचणीचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामान यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत बळीराजा मोठ्या कष्टाने शेतमाल उत्पादीत करत आहे. मात्र उत्पादीत शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

दरम्यान आता शासनाने एक नवीनच फर्मान काढलं आहे. आता खत खरेदी करतांना शेतकऱ्यांना जात सांगावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. जस की आपणांस ठाऊकच आहे की, खत खरेदी करतांना पॉस मशीनवर शेतकऱ्यांची नोंद घेतली जाते. दरम्यान आता या मशीन मध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट आले आहे.

यानुसार शेतकऱ्यांना आता त्यांची जात दुकानदार विचारत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यामुळे शेतकरी नाराज असून रासायनिक खत खरेदीसाठी जात कां विचारली जात आहे असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करतांना खत दुकानात गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या यासारखी माहिती आतापर्यंत द्यावी लागत होती.

जी की आवश्यक माहिती आहे आणि ही माहिती देण्यात शेतकऱ्यांना काही अडचण नाही. ही शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती भरली की पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा द्यावा लागतो आणि रासायनिक खत त्यांना दुकानदार देतात. या माहितीमुळे रासायनिक खतांची उपलब्धता, विक्री, साठा, आवश्यकता यांसारख्या गोष्टी शासनाला समजतात.

तसेच खतासाठी अनुदान द्यावे लागते यामुळे ही माहिती शासनाला लागते. पण आता खत खरेदी करतांना गेल्या तीन दिवसांपासून ई-पॉस मशिनच्या सॉप्टवेअरमध्ये बदल झाला आहे. आता नवीन अपडेट आले आहे. ज्यामुळे शेतकर्‍यांना खत खरेदी करतांना पूर्वीप्रमाणे वैयक्तिक माहितीही विचारली जाते आणि त्यांची जात विचारण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

रासायनिक खत खरेदी करताना जात विचारण्याचे नेमके कारण काय? याबाबत खत विक्रेत्याला विचारणा केली असता त्यांनी मशिनला नवीन अपडेट आलं असल्याचं सांगत याबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकंदरीत रासायनिक खत खरेदी करताना जात विचारण्याच्या या सगळ्या प्रकरणामुळं शेतकरी वर्ग प्रचंड निराश आहे. यावर आता राजकारण तापण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe