Marathi News : दिवाळीच्या उत्सवात विक्रमी विक्री झाल्यानंतर आता देशातील व्यापारी समुदायाचे लक्ष २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या हंगामावर आहे. देशभरात लग्न समारंभाच्या या काळात ३८ लाख विवाह संपन्न होण्याची शक्यता असून या माध्यमातून जवळपास ४.७४ लाख कोटींची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यापारी वर्गाची संघटना ‘केट’ने व्यक्त केला आहे.
दिवाळीनंतर व्यापारी वर्ग आता विवाहाच्या मोसमात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. विवाहाच्या या हंगामात लोकांकडून लग्नासंबंधी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते.

खरेदी आणि विविध सेवांवरील खर्च गतवर्षाच्या तुलनेत जवळपास एक लाख कोटींनी अधिक राहण्याची शक्यता व्यापारी संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया (केट) ने व्यक्त केली आहे.
विवाह तिथीमध्ये व्यापक व्यावसायिक उलाढाल होण्याची आशा असल्याचे कॅटने म्हटले. विविध राज्यातील ३० शहरांमधील व्यापारी संघटना आणि वस्तू व सेवेच्या घटकाकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यानच्या लग्नमुहूर्तामध्ये देशभरात ३८ लाख लग्नांचा बार उडण्याचा अंदाज आहे. या माध्यमातून एकूण जवळपास ४.७४ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे,
अशी माहिती केट संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली. या काळात एकट्या दिल्लीत चार लाख विवाह संपन्न होऊन जवळपास १.२५ लाख कोटींचा व्यापार होण्याची आशा व्यापारी संघटनेने व्यक्त केली आहे.
बाजारपेठेसाठी चांगले संकेत
तुळशी विवाहापासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून ते १५ डिसेंबर दरम्यान लग्नाचे मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमध्ये २३, २४, २७, २८ आणि २९ तारखेला तर डिसेंबरमध्ये ३, ४, ७, ८, ९ आणि १५ तारखेला विवाह मुहूर्त आहेत. दाटीवाटीने आलेल्या लग्नमुहूर्तासोबतच मोठ्या आर्थिक उलाढालीचीही चाहूल बाजारपेठेला लागली आहे.
गतवर्षी याच कालावधीत देशात जवळपास ३२ लाख विवाह संपन्न झाले आणि त्यातून एकूण ३.७५ लाख कोटींची आर्थिक उलाढाल झाली होती. यंदा यात एक लाख कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. ही बाब भारतीय अर्थव्यवस्था आणि किरकोळ व्यापारासाठी चांगले संकेत देणारी असल्याचे खंडेलवाल म्हणाले.