गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना टक्कर देतात महाराष्ट्रातील ‘हे’ समुद्रकिनारे! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठीच नाही तर फिरण्यासाठी देखील आहेत उत्तम

Beach In Maharashtra:- महाराष्ट्र म्हटला म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले निसर्ग सौंदर्य व विस्तीर्ण असा सागरकिनारा लाभलेले असे राज्य आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात व त्यातल्या त्यात तुम्ही जर कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरात फिरायला गेलात तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निसर्गाने समृद्ध असलेली ठिकाणे किंवा पर्यटन स्थळे पाहायला मिळतात.

त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा कोकण विभाग तर निसर्ग सौंदर्याची खाण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. राज्यातील कोकण किनारपट्टी म्हणजेच रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग इत्यादी जिल्हे व यासोबत या परिसरात असलेली अनेक ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहेत.

याच परिसरामध्ये सुंदर असे समुद्रकिनारे देखील आहेत व गोव्यातील समुद्र किनाऱ्यांना प्रत्येक बाबतीत सरस ठरतील असे सौंदर्य या समुद्रकिनाऱ्यांना लाभले आहे. आपल्याला माहित आहे की,नवीन वर्षाचे स्वागत असो किंवा कधी फिरण्याचा प्लॅनिंग केला असेल तरी देखील बरेचजण गोव्याला जाण्याचा विचार करतात.

गोवा म्हटले म्हणजे या ठिकाणी असलेले समुद्रकिनारे आणि नाईट लाईफसाठी खास करून प्रसिद्ध आहे. परंतु जर त्या तुलनेत आपण महाराष्ट्रातील काही समुद्रकिनाऱ्यांचा विचार केला तर ते गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना प्रत्येक बाबतीत सरस ठरतील अशी सुंदरता या समुद्रकिनाऱ्यांना लाभली आहे.

त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुमचा जर गोव्याला जायचा विचार असेल तर तुम्ही त्या ऐवजी महाराष्ट्रातील काही समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्याचा विचार करावा.

महाराष्ट्रातील हे समुद्रकिनारे आहेत अतिशय सुंदर

1- मालवण समुद्रकिनारा- कोकण किनारपट्टी ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाची असून या परिसरातील रायगड तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत व त्यापैकी मालवण समुद्रकिनारा हा अतिशय महत्त्वाचा असून हा कोकणातील सर्वात लोकप्रिय आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा समुद्रकिनारा आहे.

मालवणाचा समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून या ठिकाणी तुम्ही वाटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकतात व याकरिता हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. यासोबतच तुम्ही वेंगुर्ला, तारकर्ली या सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यांना देखील भेट देऊ शकतात.

2- गणपतीपुळे- महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हा देखील एक लोकप्रिय असा समुद्रकिनारा आहे. गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध गणपतीचे देवस्थान असून या नावाने हा समुद्रकिनारा प्रामुख्याने ओळखला जातो.

जेव्हा तुम्ही गणपतीपुळे येथे श्री गणेशाचे दर्शन घेतात व जेव्हा मंदिराच्या बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला विस्तीर्ण पसरलेला अथांग असा समुद्र नजरेस पडतो.

त्यामुळे अनेक पर्यटक दरवर्षी गणपतीपुळेला भेट देत असतात. तसेच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ अंतरावर आरे वारे बीच आहे. हे बीच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ बीच म्हणून ओळखले जाते.

3- मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारे- तसेच तुम्ही रत्नागिरी शहरांमध्ये जेव्हा जातात तेव्हा या शहराच्या अगदी जवळ मांडवी आणि भाट्ये हे दोन लोकप्रिय असे समुद्रकिनारे आहेत.

यापैकी मांडवी समुद्रकिनाऱ्यावर रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते व भाटये समुद्रकिनारा देखील रात्रीच्या वेळेस पर्यटकांनी गजबजलेला दिसून येतो.

4- अलिबागचा समुद्र किनारा- मुंबई आणि पुण्यापासून जवळच असलेला हा समुद्रकिनारा देखील अतिशय प्रसिद्ध असून खूपच सुंदर असा समुद्रकिनारा आहे. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर कधीही गेला तरी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. याशिवाय तुम्ही शिरोडा, मुरुड, गुहागर, वेळणेश्वर, श्रीवर्धन या व इतर समुद्रकिनाऱ्यांना ट्रीप प्लान करून भेट देऊ शकतात.