Indian Railway: भारतातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमे पर्यंत रेल्वेचे जाळे विकसित करण्यात आलेले आहे. आज देखील भारतीय रेल्वे(Indian Railway)च्या माध्यमातून अनेक ठिकाणी रेल्वेचे जाळे विकसित करण्यात येत असून प्रवासी वाहतूकच नाही तर कृषी आणि औद्योगिक(Industries) क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील भारतीय रेल्वेचे महत्त्व खूप आहे.
सध्या भारतामध्ये भारतीय रेल्वेचे प्रगत स्वरूप असलेली वंदे भारत ट्रेनची सुरुवात देशातील 23 मार्गांवर करण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील भारतीय रेल्वे खूप महत्त्वाची ठरली आहे. एकंदरीत देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु प्रवासी करणाऱ्या गाड्यांचा विचार केला तर यामध्ये भारतीय रेल्वेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या दहा गाड्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचा वेग, त्यांच्यामध्ये मिळणाऱ्या सुविधा ह्या खूप आकर्षक असल्यामुळे त्यांचे वेगळेपण ठासून दिसून येते. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण भारतीय रेल्वेच्या दहा टॉप ट्रेन विषयी महत्वाची माहिती घेणार आहोत.
या आहेत भारतीय रेल्वेच्या दहा टॉप ट्रेन
1- गतिमान एक्सप्रेस– गतिमान एक्सप्रेस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान एक्सप्रेस असून ती दिल्ली ते झाशी दरम्यान धावते. गतिमान एक्सप्रेस मधील सोई सुविधांचा विचार केला तर यामध्ये बायो टॉयलेट तसेच एलएचबी कोच, स्लाइडिंग दरवाजे आणि फायर अलार्म सारख्या सुविधा देण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर या एक्सप्रेस मध्ये वाय-फाय व व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
2- वंदे भारत – वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेची प्रथम क्रमांकाची वेगवान ट्रेन असून तिचा टॉप स्पीड 180 किलोमीटर प्रतितास इतका आहे. सध्या नवी दिल्ली ते भोपाल या दरम्यान सर्वात वेगवान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असल्याचे मानले जाते. वंदे भारत ट्रेन मध्ये देखील अनेक सुविधा प्रवाशांना देण्यात आलेले आहेत. सध्या देशातील 23 ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे.
3- शताब्दी एक्सप्रेस– शताब्दी देखील भारतातील वेगवान ट्रेन पैकी एक असून देशातील अनेक मेट्रो शहरांना ट्रेनच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून त्याच दिवशी ती तिच्या मूळ स्टेशनवर परत देखील येते. यामध्ये भोपाल शताब्दी एक्सप्रेस ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान ट्रेन समजले जाते व तिचा वेग 155 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
4- राजधानी एक्सप्रेस– भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला भारतातील विविध राज्यातील जी मोठी शहरी आहेत त्यांना किंवा राज्यांच्या राजधानी असलेल्या शहरांशी कनेक्टिव्हिटी या ट्रेनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना चहा कॉफी तसेच पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, नाश्ता आणि आईस्क्रीम इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या असून या ट्रेनचा वेग हा प्रति तास 140 किलोमीटर इतका आहे.
5- दुरांतो एक्सप्रेस– 135 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी दुरांतो एक्सप्रेस ही नवी दिल्ली ते सियालदाह दरम्यान धावते. दुरांतो एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना चहा कॉफी आणि नाश्त्याची सुविधा दिली जाते.
6- गरिब रथ एक्सप्रेस– लांब पल्ल्याची प्रवासी ट्रेन म्हणून या एक्सप्रेसला ओळखले जाते. या एक्सप्रेसचे भाडे इतर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या एसी क्लास पेक्षा कमी असून या ट्रेनचा वेग 140 किलोमीटर प्रतितास इतका आहे. सध्या भारतामध्ये 26 गरिब रथ एक्सप्रेस सुरू आहेत.
7- तेजस एक्सप्रेस– भारतीय रेल्वेची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन म्हणून तेजस एक्सप्रेस ओळखली जाते. इतर वेगवान एक्सप्रेसच्या तुलनेत तेजस एक्सप्रेस ला सर्वाच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे.
8- वातानुकूलित ट्रेन– भारतीय रेल्वेने अनेक एअर कंडिशनर अर्थात वातानुकूलित एक्सप्रेस सुरू केले असून यामध्ये वातानुकूलित कोच देण्यात आलेले आहेत. रेल्वेच्या काही विभागांमध्ये या एक्सप्रेस 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावतात.
9- सुविधा एक्सप्रेस– भारतातील प्रवाशांच्या दृष्टिकोनातून जे मार्ग जास्त व्यस्त आहेत अशा मार्गांसाठी सुविधा एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले होती.सुविधा एक्सप्रेस ला भारतीय रेल्वेच्या नेटवर्कमध्ये शताब्दी एक्सप्रेस इतकी प्राथमिकता देण्यात आलेली आहे.
10- संपर्क क्रांति एक्सप्रेस– संपर्क क्रांति एक्सप्रेस ही रेल्वेची एक श्रेणी असून भारतीय सर्वात वेगवान ट्रेनमध्ये या गाड्यांच्या समावेश होतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीशी इतर मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून संपर्क क्रांति ट्रेनचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कमीत कमी प्रवासी तिकीट दरामध्ये संपर्क क्रांती एक्सप्रेस एक चांगला पर्याय उपलब्ध करून देते.