एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांचा गेल्या काही वर्षाचा निकाल बघितला तर बहुतांश विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या दोन्ही परीक्षांचा विचार केला तर यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, प्रचंड प्रमाणात कष्ट, जिद्द इत्यादी गुण महत्त्वाचे असून यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आता चमकू लागले आहेत.बरेच विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीत काम करताना अभ्यास आणि कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय देखील यश मिळवत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या सुळेवाडी या छोट्याशा गावातील वैभव बाळासाहेब गुंजाळ या तरुणाचा विचार केला तर वैभव हा इंजिनियर असताना देखील त्याने नोकरी न करता स्पर्धा परीक्षांची तयारी केली व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केले.
छोट्याशा गावातील या तरुणाची यशाची कहाणी
याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सुळेवाडी हे छोटेसे गाव असून या गावातील वैभव बाळासाहेब थोरात या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे वैभव याने इंजिनिअरिंग पूर्ण केलेले असताना देखील नोकरी न करता काहीतरी वेगळे करावे हे जिद्द मनाशी बाळगून स्वतःच्या कष्टाच्या जीवावर यश संपादन केले.
आपल्याला माहित आहे की बरेच तरुण-तरुणी या परीक्षांच्या तयारी करिता अनेक प्रकारच्या अकॅडमी, कोचिंग क्लासेस जॉईन करतात. परंतु यापैकी वैभव यांनी काहीही न करता मित्रांसोबत राहून स्वतः या परीक्षेची तयारी केली व यश मिळवले.विशेष म्हणजे वैभव याचे कुटुंब शेतकरी कुटुंब असून शेती व्यवसाय सांभाळात त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.
वैभव गुंजाळ यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
सुळेवाडी या लहानशा गावात राहणारे वैभव गुंजाळ हे भावंडांपैकी कुटुंबात सगळ्यात थोरले असून जेव्हा 2019 या वर्षी त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या आई मनीषा गुंजाळ यांनी घेतली. तसे पाहायला गेले तर गुंजाळ कुटुंब हे शेतकरी कुटुंब असून कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या वैभव यांच्या आईने पार पाडल्या. घरची जेमतेम शेती असलेल्या या कुटुंबातील मोठा मुलगा वैभव यांना त्यांच्या आईने बारागाव पिंपरी या ठिकाणी शिक्षणासाठी दहावीला पाठवले व दहावीच्या परीक्षेत त्यांनी 90 टक्के गुण मिळवून त्यांची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली.
तसेच पुढील शिक्षण त्यांनी संगमनेर या ठिकाणी पूर्ण केले व त्या ठिकाणी त्यांनी केमिकल इंजीनियरिंग पूर्ण केली. परंतु तरी देखील कुठल्याही प्रकारची नोकरी न करता अगदी दहावीपासून अंगावर पोलिसाची वर्दी घालावी ही मनोमन इच्छा असल्यामुळे त्यांनी नोकरी न करता स्पर्धा परीक्षांची तयारी केली. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना महामारीच्या संकटामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या.
या कालावधीत देखील त्यांनी घरची शेती व्यवसाय सांभाळून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची संपूर्णपणे तयारी केली. तसेच त्यांचा दुसरा भाऊ भूषण हा देखील पुण्यामध्ये यूपीएससीची तयारी करत असून वैभव यांची बहीण उषा यादेखील इंजिनिअर म्हणून पुण्यात नोकरी करत आहे. आईने प्रचंड कष्ट करून या भावंडांना वाढवले व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षण देखील दिले.
आईच्या या कष्टाला न्याय देत वैभव यांनी स्वतःच्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडून ते आज फौजदार बनले आहेत. सुळेवाडी यासारख्या छोट्या गावात पहिला फौजदार होण्याचा बहुमान देखील त्यांनी मिळवला आहे. या वैभव यांच्या उदाहरणावरून दिसून येते की ती कशीही राहिली परंतु जर अफाट जिद्द, कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठल्याही प्रकारची यश शक्य असते.