महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील फक्त 3 दिवस धावणार ! 15 जून पासून लागू होणार नवं वेळापत्रक

Vande Bharat Railway : भारतीय रेल्वे कडून मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे, या सोबतच मुंबई ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन आता थेट नांदेड पर्यंत धावणार आहे. त्यामुळे राज्यातील वंदे भारतचे नेटवर्क आणखी वाढणार आहे आणि यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवड्यातून सहा दिवस धावणारी एक वंदे भारत आता फक्त तीन दिवस चालवली जाणार आहे.

दरम्यान, आज आपण महाराष्ट्रातून धावणाऱ्या कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात हा बदल झाला आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

या वंदे भारतच्या वेळापत्रकात मोठा बदल

सध्या महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.

दरम्यान याच अकरा वंदे भारत एक्सप्रेस पैकी मुंबई येथील सीएसएमटी ते मडगाव म्हणजेच मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.

हा बदल उद्यापासून म्हणजेच 15 जून 2025 पासून लागू होणार आहे. खरे तर, दरवर्षी मान्सून सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू होते.

यानुसार यंदाही या रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे आणि या पावसाळी वेळापत्रकाच्या अनुषंगाने मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात सुद्धा बदल झाला आहे.

ही गाडी आता आठवड्यातून सहा दिवस ऐवजी फक्त तीन दिवस चालवली जाणार आहे. खरंतर, पावसाळी काळात कोकण रेल्वे मार्गावर अपघात होऊ नये यासाठी रेल्वे गाड्यांचा वेग कमी केला जातो. यामुळे गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या कमी होते आणि प्रवासाचा कालावधी वाढत असतो.

यानुसार मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे, ही गाडी आता आठवड्यातून फक्त तीन दिवस चालवली जाणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मुंबई ते गोवा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला आता दहा तास आणि पाच मिनिटांचा वेळ लागणार आहे.

कसं असणार नवं वेळापत्रक?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आठवड्यातून फक्त तीन दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी आता आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवसच धावणार आहे.

या गाडीच्या नव्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन ही गाडी सकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी ही गाडी गोव्याला म्हणजेच मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी गोव्यावरून म्हणजेच मडगाव रेल्वे स्थानकावरून दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी मुंबईला पोहोचणार आहे. ही गाडी या मार्गावरील दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी अशा महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.