Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. वंदे भारत ट्रेन 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर मग इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.
सध्या स्थितीला ही गाडी देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील अकरा महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव सीएसएमटी ते शिर्डी पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी नागपूर ते सिकंदराबाद नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपूर या अकरा महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाची बाब अशी की राज्याला आणखी काही नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ची भेट मिळणार आहे. मुंबई ते शेगाव पुणे ते शेगाव पुणे ते बेळगाव अशा काही प्रमुख मार्गांवर ही गाडी सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खरे तर सध्या जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे ती चेअर कार प्रकारातील आहे आणि या गाडीला प्रवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, आता या गाडीला मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
2025 मध्ये सुरू होणार दहा वंदे भारत
मीडिया रिपोर्टनुसार 2025 मध्ये दहा वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहेत. म्हणजे वंदे भारत स्लीपर गाड्या मोठ्या प्रमाणात सुरू करून भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे असं आपण म्हणू शकतो.
2025 – 26 या आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च 2025 ते मार्च 2026 या एका वर्षाच्या काळात दहा नव्या गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांमध्ये वेग, सुरक्षितता आणि लक्झरी यांचा मेळ बसेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
कसे असणार रूट ?
या चालू आर्थिक वर्षात नवीन दहा वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत पण या गाड्या नेमक्या कोणत्या मार्गांवर धावणार? याचे रूट अद्याप निश्चित झालेले नाहीत.
मात्र या संदर्भातील एक नव अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मुंबई ते दिल्ली, पुणे ते दिल्ली नवी दिल्ली ते श्रीनगर या मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होऊ शकते.