Vande Bharat Train Update:- वंदे भारत ट्रेन म्हटले म्हणजे एक आरामदायी प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. भारतामध्ये अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवल्या जात असून अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेले आहेत.
तसेच प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आता वंदे भारत ट्रेनच्या रचनेमध्ये बदल करण्यात येत असून आता शयनयान श्रेणीमध्ये वंदे भारत ट्रेन येणार आहे तसेच ते आता केशरी रंगात देखील अवतारणार आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त प्रकारच्या सुविधा मिळाव्यात याकरिता वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक प्रकारचे महत्त्वाचे बदल देखील करण्यात येत आहे.

याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील वंदे भारत एक्सप्रेसला खूप मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून यामध्ये तरुणाईचा समावेश अधिक आहे. महाराष्ट्रात मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या होत्या. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसला सर्वात जास्त प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. याच बाबतीतली महत्त्वाचे अपडेट या लेखात आपण बघणार आहोत.
मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसला आहे सर्वाधिक प्रवाशांचे पसंती
महाराष्ट्रामध्ये 10 फेब्रुवारी 2022 या दिवशी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन्ही मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या व त्यानंतर 11 डिसेंबर 2022 ला बिलासपूर ते नागपूर आणि त्यानंतर मुंबई ते मडगाव अशा चारमार्गांवर सध्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. आरामदायी आणि वेगवान प्रवासामुळे प्रवाशांच्या माध्यमातून देखील या वंदे भारत एक्सप्रेसला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसून येत आहे.
प्रवासी संख्येचा विचार केला तर मागच्या महिन्यातील पंधरा सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान नुसत्या एकट्या मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून 56 हजार प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे या प्रवाशांमध्ये 15 ते 45 या वयोगटातील प्रवासी अधिक संख्येने होते.
त्यानंतर मुंबई ते शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेस चा नंबर लागतो व या वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून 44 हजार 857 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. त्या पाठोपाठ बिलासपूर ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून 29 हजार 772 आणि मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून 12,933 प्रवाशांनी प्रवासाचा आनंद घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मधील पुरुष व महिला प्रवाशांची संख्या आणि वयोगट
यामध्ये एकट्या मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चा विचार केला तर यामध्ये एकूण 55 हजार 905 प्रवाशांनी प्रवास केला व यामध्ये 34 हजार सोळा प्रवासी पुरुष होते तर 21 हजार 881 प्रवासी या महिला होत्या. या प्रवाशांचा वयोगटाचा विचार केला तर 15 ते 30 या वयोगटातील प्रवाशांची संख्या 18764, 31 ते 45 वयोगटातील प्रवाशांची संख्या 18 हजार 42, 46 ते 60 वयोगटातील प्रवासी संख्या 11528, साठ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या प्रवाशांची संख्या 5133 आणि 1 ते 14 वर्षे वयोगटातील 2438 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला.
एकंदरीत या आकडेवारीवरून दिसून येते की महाराष्ट्रमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला चांगल्या प्रकारे प्रवाशांचा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.