Viral News : महाराष्ट्रात सध्या लग्नाळू शेतकरी पुत्रांना लग्नाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. पोरगा शेती करतो म्हटलं की कोणी पोरगी द्यायला तयार होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती सबंध महाराष्ट्रभर सारखीच आहे. आता संभाजीनगर मधून एका लग्नाळू शेतकरी पुत्राने लग्न जमत नाही म्हणून चक्क आमदारांनाच कॉल केला आहे.
या शेतकऱ्याने आमदारांना फोन करत लग्नासाठी पोरगी शोधण्याचे विनंती केली आहे. यामुळे सध्या या लग्नाळू शेतकऱ्याच्या लेकाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या रत्नपुर येथील विजय होळकर नामक तरुणाने घरची परिस्थिती टामटूम असतांना, श्रीमंती असतांना, आठ नऊ एकर शेत जमीन असूनही लग्न जमत नसल्याच्या कारणाने कन्नड विधानसभाचे ठाकरे गटाचे आमदार उदय सिंग राजपूत यांना लग्नासाठी पोरगी शोधा म्हणून फोन केला आहे.
यामुळे सध्या या तरुणाची आणि आमदार उदयसिंग राजपूत यांची मोठी चर्चा रंगली आहे. खरं पाहता शिवसेनेचे कन्नड सोयगावचे आमदार उदयसिंग यांना फोन करून या तरुणाने लग्न जमत नसल्याची आपली व्यथा सविस्तर मांडली आहे. या तरुणाने सांगितल्याप्रमाणे, “साहेब माझी परिस्थिती काही फार बिकट नाही, भद्रा मारोतीच्या खुल्ताबाद तालुक्यात ८-९ एकर शेती आहे. पण लग्नासाठी कोणी मुलगीच देत नाही.
साहेब तुम्ही काही तरी करा, तुमच्या सर्कलमध्ये खूप मुली आहेत.” तरुणाचे हे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर आमदार राजपूत यांनी देखील तरुणाच्या या मागणीवर कोणताचं संकोच न करता सकारात्मक असं उत्तर दिलं.
आमदार उदयसिंग राजपूत यांनी तरुणाला सांगितलं की “तुम्ही तुमचा बायोडाटा माझ्याकडे पाठवा निश्चित मी तुमच्यासाठी मुलगी शोधण्याचा प्रयत्न करतो.” यामुळे सध्या आमदार राजपूत आणि रत्नापूर येथील या तरुणाची फोन पे लग्नाची झालेली चर्चा चांगलीच रंगतदार बनली आहे.
विशेष म्हणजे आमदार राजपूत यांनी यापूर्वी देखील परिसरातील 60 ते 70 नवयुवकांची लग्न जमवली आहेत, यामुळे या रत्नपुरच्या लग्नाळुला देखील आमदार महोदय नवंवधू शोधतील हीच आशा. या निमित्ताने महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांचा लग्नाचा प्रश्न किती गंभीर आहे ही बाब देखील प्रकर्षाने जाणवत आहे.