Wheat Farming : गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तापमान वाढीमुळे सातत्याने शेती पिकांना नुकसान होत आहे. विशेषता रब्बी हंगामातील गहू पिकाला गेल्या काही वर्षांपासून तापमान वाढीचा मोठा फटका बसत आहे. याही वर्षी तापमान वाढीचा उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे झालेली तापमान वाढ गहू पिकासाठी घातक ठरणार असल्याचे महत्व व्यक्त करण्यात आले असून तापमान वाढीपासून गहू पीक संरक्षित करण्यासाठी काही उपाययोजना देखील सुचवण्यात आल्या आहेत.
सामान्य पेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू समवेतच इतर बागायती पिकांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता आयएमडीकडून काही सूचना जारी झाल्या आहेत. दरम्यान आज आपण आयएमडीने जारी केलेल्या या सूचना थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या सूचनेत दिलेल्या माहितीप्रमाणे, गहू पीक फुलोरा अवस्थेत असताना आणि पक्वतेच्या अवस्थेत असताना तापमान वाढ झाली तर उत्पादनात घट ही होत असते. विशेष म्हणजे रब्बी हंगामातील तर बागायती पिकांना देखील या तापमान वाढीचा फटका बसतो. हवामान विभागाच्या मते गहू उत्पादक राज्य महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये तापमान हे 35 ते 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे.
दिवसा वाढत असलेल्या या तापमानामुळे गहू उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात उष्णतेची लाट देखील आपल्या राज्यात येऊ शकते असा अंदाज आहे. परिणामी गहू पिकासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. तापमान वाढल्याच्या परिस्थितीत पिकांना हलक्या स्वरुपात पाणी दिले जाऊ शकते.
उच्च तापमानाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजीपाला पिकांच्या दोन सरींमधील जागेत आच्छादन सामग्रीचा वापर करावा जेणेकरुन मातीचा ओलावा टिकून राहील. निश्चितच तापमान वाढीमुळे गेल्या वर्षी देखील गव्हाच्या उत्पादनात घट झाली होती आणि या वर्षी देखील तापमानात वाढ होत असल्याने गहू पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.