Wheat Farming : महाराष्ट्रासह भारतात गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. खरं पाहता गहू हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. आतापर्यंत गव्हाच्या जेवढ्या जाती विकसित झाल्या आहेत त्या जातींची रब्बी हंगामातच पेरणी करणे सोयीचे आहे. रब्बी हंगामात महाराष्ट्र पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.
अशा परिस्थितीत देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधकांनी गव्हाची अशी जात शोधून काढली आहे जीचीं पेरणी मार्च अखेर करता येणार आहे. म्हणजेच उन्हाळी हंगामातही आता गव्हाची शेती शक्य होणार आहे. यामुळे आता शेतकरी बांधव आता आपल्या सोयीनुसार गहू पेरणीचे वेळापत्रक ठरवू शकणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद या संस्थेने हे गव्हाचे वाण विकसित केले आहे. एचडी 3535 असे या गव्हांच नाव असून या बियाण्याची चाचणी पूर्ण झाली आहे. सोमवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने या गव्हाच्या वाणाची घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या उपलब्ध असलेल्या वाणाची रब्बी हंगामात पेरणी केली जाते आणि एप्रिलमध्ये या वाणापासून उत्पादन मिळत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तापमान वाढीचा फटका या सामान्य वाणाला बसत आहे.
ऐन मार्च महिन्याच्या म्हणजेच गहू पीक अंतिम टप्प्यात असताना तापमानात वाढ होते आणि यामुळे गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित होते त्यामुळे उतारा कमी मिळतो. यामुळे एकरी उत्पादकता गेल्या काही वर्षांपासून घटत होती. ज्यावर्षी तापमान वाढ रब्बी हंगामात राहिली त्यावर्षी कायमच गव्हाचा उतारा कमी राहिला आहे. अशा परिस्थितीत गव्हाच्या नवीन जातीचा शोध लावणे अत्यावश्यक होते.
निश्चितच या नवीन जातीची पेरणी मार्च अखेर होणार असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार भारतीय कृषी संशोधन परिषदेने या नवीन जातीची नोंदणी पूर्ण केली आहे. डीसीएम श्रीराम लिमिटेड कंपनीला या वाणाचा परवाना देखील देण्यात आला आहे. आता सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी मधून हे वाण गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की अलीकडील काही वर्षात भारतीय कृषी संशोधन परिषदेने लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या तीन नवीन जातींचा शोध लावला आहे. एचडीसीएसडब्ल्यू 18, एचडी 3410, एचडी 3385 या तीन नवीन जाती आहेत. यापैकी एचडी 3385 ही आत्ताच विकसित झालेली जात आहे. हे वाण इतर दोन वाणाच्या तुलनेत सरस असल्याचा दावा आहे.