‘या’ जातीची कोंबडी पाळाल तर नुसते अंडी विक्रीतून वर्षाला 60 ते 70 हजार रुपये कमवाल! वाचा या कोंबडीची वैशिष्ट्ये

भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन सारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. या तीनही प्रकारच्या व्यवसायामध्ये प्राण्यांच्या जातीवंत अशा जातींची निवड पालनासाठी करणे खूप महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे पशुपालन व्यवसायामध्ये वाढीव दूध उत्पादनासाठी गाई किंवा म्हशीच्या जातीवंत जाती महत्त्वाच्या आहेत.

अगदी त्याचप्रमाणे शेळीपालनात देखील शेळ्यांच्या दर्जेदार व चांगल्या उत्पादनक्षम जातींची निवड खूप महत्त्वाची असते. हीच बाब कुक्कुटपालन व्यवसायाला देखील लागू होते. कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जर तुम्ही देशी कोंबडीचे पालन करत असाल तर यामध्ये कोंबडीच्या जातीची निवड पालनासाठी खूप महत्त्वाची ठरते.

जोडधंद्यांपैकी सध्या कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात असून या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे नफा मिळताना दिसून येत आहे. कुक्कुटपालनामध्ये देशी कोंबडी पालन हे मांस आणि अंडी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. परंतु देशी कोंबड्यांमध्ये अनेक जाती असून यामध्ये जातिवंत जातीची निवड करणे खूप गरजेचे असते. या दृष्टिकोनातून आपण या लेखामध्ये कोंबडीच्या अशा एका जाती बद्दल माहिती घेणार आहोत ज्याचे एका अंड्याची किंमत शंभर रुपये इतकी आहे.

 असिल कोंबडीचे पालन देईल चांगले आर्थिक उत्पन्न

कुक्कुटपालन हा व्यवसाय कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय असून यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. जास्त खर्च करण्याची गरज या व्यवसायाला नसते. या माध्यमातून मिळणारे आर्थिक उत्पन्न चांगल्या पद्धतीचे मिळते. समजा शेतकऱ्यांनी जर विशिष्ट अशा जातींच्या पाच ते दहा कोंबड्यांपासून कुक्कुटपालनाला सुरुवात केली तर वर्षभरात लाखो रुपयांची कमाई देखील शेतकरी करू शकतात.

अशाच प्रकारे जर आपण कोंबडीच्या असिल या जातीच्या दृष्टिकोनातून बघितले या कोंबडीचे पालन प्रामुख्याने तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि उडीसा मध्ये केले जाते व त्या ठिकाणाहून तिची अनेक देशांमध्ये निर्यात देखील होते.देशी कोंबडीचे पालन करायचे असेल तर शेतकऱ्यांनी अशी जात निवडायला हवी की त्याच्या अंड्याला बाजारात चांगला दर मिळतो.

या दृष्टिकोनातून असिल जातीच्या कोंबड्या पाळणे हे महत्त्वाचे ठरू शकते. कोंबडीच्या या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे कडकनाथ कोंबडी पेक्षा हिची किंमत जास्त आहे व वर्षाला ती फक्त 60 ते 70 च अंडी देते. परंतु सामान्य कोंबडीच्या अंड्या पेक्षा असिल जातीच्या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत जास्त असते. साधारणपणे बाजारामध्ये या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत शंभर रुपयापर्यंत आहे व अशा परिस्थितीत एक कोंबडी पासून वर्षभरात 60 ते 70 हजार रुपये कमवता येऊ शकतात.

 फायटर कोंबडी म्हणून ओळखली जाते

असिल कोंबडी ही सामान्य स्थानिक कोंबड्यांसारखे नसते. या कोंबडीचे तोंड लांब असते व दिसायला ते लांब दिसते. या कोंबड्यांचे वजन खूपच कमी असते व या जातीच्या चार ते पाच कोंबड्यांचे वजन फक्त चार किलो असते असे म्हटले जाते. या जातीची कोंबडी लढाईत प्रामुख्याने वापरली जाते. या सगळ्या गुणधर्मामुळे जर शेतकऱ्यांनी असिल जातीची कोंबडी पाळली तर अंडी विकून शेतकरी चांगला पैसा मिळवू शकतात.