Digital Ration Card:- शासकीय कामांकरिता किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरता प्रामुख्याने जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशनकार्ड यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये जर आपण रेशन कार्डचा विचार केला तर अंत्योदय योजना किंवा इतर योजनांच्या माध्यमातून स्वस्त धान्य योजनेतून धान्य घेण्यासाठी देखील रेशन कार्ड वापरले जाते हे आपल्याला माहिती आहे.
रेशन कार्ड च्या बाबतीत जर आपल्याला नवीन रेशन कार्ड किंवा विभक्त रेशनकार्ड काढायचे असेल तर तहसील कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात व मध्यस्थी लोकांना पैसे देऊन रेशन कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रक्रियेमध्ये मात्र दलालांकडून आर्थिक लूट तर होतेच परंतु वेळेत काम देखील होत नसल्यामुळे मानसिक त्रास देखील होतो.

या दृष्टिकोनातून आता जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून डिजिटल रेशनकार्ड ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 60 नवीन रेशन कार्डधारकांना ऑनलाइन डिजिटल कार्ड देखील देण्यात आले आहे. त्यासंबंधीचीच माहिती या लेखात घेणार आहोत.
फायदेशीर राहील डिजिटल रेशनकार्ड
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आता अगदी घरी बसून डिजिटल रेशनकार्ड काढता येणार आहे व त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील 60 नवीन रेशन कार्डधारकांना डिजिटल रेशन कार्ड देण्यात आले आहे.
डिजिटल रेशनकार्ड मुळे आता रेशनकार्ड काढण्यासाठी दलालांकडे जाण्याची किंवा तहसील कार्यालयाच्या खेटा मारण्याची गरज नागरिकांना राहणार नाही. विशेष म्हणजे आता जास्तीचे पैसे देखील देण्याची गरज असल्यामुळे नागरिकांचा पैसा आणि वेळ देखील वाचणार आहे.
तसेच या डिजिटल रेशन कार्डची प्रिंट काढून ती तुम्हाला आधार कार्ड सारखी वापरता येणार आहे. या डिजिटल रेशन कार्ड वरच्या प्रिंटवर संबंधित लाभार्थी हा नेमका कोणता रेशन कार्डधारक आहे याबद्दलची देखील माहिती असणार असून त्याच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या व आधार क्रमांक देखील असणार आहे. दलालांच्या माध्यमातून जी काही एका रेशनकार्ड करिता पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंतची लूट होत होती ती आता थांबणार असून शासकीय शुल्कामध्ये नागरिकांना डिजिटल रेशनकार्ड आता मिळणार आहे.
डिजिटल रेशन कार्डसाठी असा करा अर्ज
डिजिटल रेशनकार्ड काढण्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्याकरिता https://mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे असून या संकेतस्थळावर गेल्यानंतर ऑनलाईन रेशन कार्ड अर्ज या पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक ती माहिती भरून अर्ज सबमिट करावा व अर्जाची प्रिंट काढून त्यावर सही करून ती अर्जाची प्रिंट तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात किंवा सीएससी केंद्रात जमा करावे. संबंधित विभागाकडून प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्ड देण्यात येईल.