Missing Link Project:- महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्पांची कामे सध्या सुरू असून राज्याच्या विविध भागांमध्ये तसेच मुंबई आणि पुणे तसेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू असून अनेक शहरांमध्ये उड्डाणपुले उभारण्यात येत आहेत. जर आपण हे रस्ते प्रकल्प किंवा उड्डाणपुलांचे महत्त्व बघितले तर वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्याच्या दृष्टिकोनातून आणि वेगवान प्रवासासाठी हे सगळे प्रकल्प खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
अगदी याच पद्धतीचा जर एक प्रकल्प बघितला तर तो मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. आपल्याला माहित आहे की जेव्हा मुंबई पुणे हा प्रवास केला जातो तेव्हा तो प्रामुख्याने खंडाळा घाटातून करावा लागतो. परंतु या घाटातून प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते.

परंतु आता वाहतूक कोंडीची ही समस्या संपणार असून या एक्सप्रेस वे वरून मुंबई- पुणे असा प्रवास करताना खंडाळा घाट रस्त्यात लागणार नाही.
यामागील प्रमुख कारण म्हणजे मुंबई ते पुणे या महामार्गावर महत्त्वाकांक्षाचा मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये केबल स्टेड पूल उभारला जात आहे. त्यामुळे आता या महामार्गावरून मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास आणखी जलद होण्यास मदत होणार आहे.
कसे आहे मिसिंग लिंक प्रकल्पाचे स्वरूप?
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई आणि पुण्याला जोडण्याकरिता मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम आता पूर्ण होण्याच्या दिशेने असून या प्रकल्पाच्या अंतर्गतच आता सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पूल उभारला जात आहे.
या प्रकल्पाचे देखील 90% काम आता पूर्ण झाले असून 2025 या वर्षात हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई व पुणे दरम्यानच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या दोन्ही शहरातील अंतर 6 km ने कमी होणार आहे तर प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी वाचणार आहे.
या प्रकल्पांतर्गत एकूण चार मार्गिका असलेले दोन बोगदे उभारण्यात येत असून यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर असून दुसरा बोगद्याची लांबी ही 1.67 किलोमीटर असणार आहे. या दोनही बोगद्यांची 98% काम पूर्ण झाले आहे. तसंच या प्रकल्पांतर्गत खंडाळा खोऱ्यामध्ये 180 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारला जात असून पावसाळा संपल्यानंतर आता त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे.
खंडाळा येथील या केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाटात जावे लागणार नाही. परंतु प्रवासा दरम्यान लोणावळ्यात प्रवेश करायचा असेल तेव्हा खंडाळा घाटातून जावे लागेल.
14 किलोमीटरचा हा मिसिंग लिंक प्रकल्प पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणार आहे.साधारणपणे 2025 मध्ये हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.