Phule Amrutkal App: ‘या’ एप्लीकेशनची मदत घ्या आणि गोठ्यातील गाय आणि म्हशीचे नियोजन करा! नाही येणार दूध उत्पादनात घट

Ajay Patil
Published:
phule amrutkal app

Phule Amrutkal App:- शेतीसोबत पशुपालन व्यवसाय भारतामध्ये फार पूर्वीपासून केला जातो व आता व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे.

पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे सर्व बाजूंनी गाई म्हशींचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे खूप गरजेचे असते. यामध्ये चारा व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे.

या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये थोडी जरी चूक झाली तरी देखील त्याचा विपरीत परिणाम हा दूध उत्पादनावर होण्याची शक्यता असते. तसेच बदलत्या तापमानानुसार जनावरांचे व्यवस्थापनात बदल करणे देखील तितकेच गरजेचे आहे. बऱ्याचदा अनेक नैसर्गिक परिस्थिती जसे की वादळ,

अतिवृष्टी किंवा गारपीट किंवा अवकाळी पावसामुळे  जनावरांचे चारा किंवा पाण्याचे नियोजन कोलमडते व जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो व त्यामुळे दूध उत्पादनात देखील पाच ते 20 टक्क्यांपर्यंत घट आल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पशुसंवर्धनाकरिता एक खास एप्लीकेशन तयार करण्यात आलेले असून त्याचे नाव फुले अमृतकाल असे आहे. हे पशुसल्ला मोबाईल एप्लीकेशन असून याच्या मदतीने  शेतकऱ्यांना जनावरांचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

 पशुपालकांना कसा होईल या ॲप्लिकेशनचा फायदा?

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू झालेला असल्यामुळे या कालावधीत जनावरांवर उष्णतेचा प्रचंड प्रमाणात ताण येतो. परंतु आता या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जनावरांवर येणारा उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

याकरिता वेळोवेळी सावलीची सोय करणे तसेच योग्य प्रकारे वायुविजन गोठ्यात ठेवणे, थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, पंखा किंवा फॉगर यंत्रणा आपोआप चालू बंद करणे,इत्यादीपासून तर जनावरांसाठी आहाराचे नियोजन देखील या माध्यमातून पशुपालकांना करता येणार आहे.

 अशा पद्धतीने करा या एप्लीकेशनचा वापर

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या एप्लीकेशनचा वापर करण्यासाठी अगोदर ते तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गूगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करणे गरजेचे आहे व त्यानंतर नोंदणी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर नमूद करावा व त्या नंबर वर ओटीपी मिळाल्यावर तुमचा पत्ता व लोकेशन टाकून एप्लीकेशन सुरू करावे.

तसेच तुम्हाला हवे असलेल्या गाईच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणाचे तापमान आद्रता निर्देशांक तुम्हाला लागलीच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळतो. यावरून गाईचा किंवा इतर जनावरांचा उष्णतेचा ताण ओळखून तुम्हाला लागलीच उपायोजनांबद्दल सल्ला मिळू शकतो.

या एप्लीकेशनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीने तापमान व आद्रतेचे सेन्सर्स वापरते व त्यावरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यक्तिगत सल्ला व सूचना देखील पुरवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe