तापमानात घट ! वातावरणात बदल झाल्याचा परिणाम पिकांवर आणि मानवी शरीरावर

Ahmednagarlive24 office
Published:
Weather News

Weather News : नवरात्रोत्सव सरताच गुलाबी थंडीची चाहूल लागली असून गेल्या तीन ते चार दिवसांत राहुरीच्या तापमानात तीन अंशांनी घट झाली आहे.वातावरणात बदल झाल्याचा परिणाम पिकांवर आणि मानवी शरीरावर होण्याच्या शक्यतेने काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांकडून करण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पुरेसा पाऊस न पडल्याने वातावरणात अनेक बदल घडलेले आहेत. यापूर्वी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातदेखील छोटे-मोठे पाऊस झालेले आहेत. असे असताना यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पावसाने ओढ दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून ऑक्टोबर हिट सर्वत्र अनुभवास मिळत आहे. विजयादशमी दसऱ्यापासून रात्रीच्या तापमानात तीन अंशांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक हवामान केंद्रातून प्राप्त माहितीनुसार गेल्या आठवड्यात दिवसाचे तापमान ३४ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ अंश सेल्सिअस होते.

गेल्या दोन दिवसांमध्ये दिवसाचे तापमान एक अंशाने कमी झाले, तर रात्रीच्या तापमानामध्ये तीन अंशांनी घट झाली आहे. राहुरीचे कमाल तापमान ३२ अंश तर किमान तापमान १७.५ अंश झाले आहे.

तापमान कमी झाल्यामुळे व वातावरणात बदल झाल्यामुळे पिकांवर आणि मानवी शरीरावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी नागरिक महिलांची रेलचेल सुरू झाल्याचे चित्र विविध ठिकाणी दिसत आहे.

काही दिवस असेच तापमान राहील

गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. किमान तापमान १७.६ इतके नोंद झाले असून आणखी काही दिवस असेच तापमान राहील. -मोहनराव देठे, प्रभारी केंद्र अधिकारी, भारतीय हवामान शास्त्र विभाग, राहुरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe