Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून, धरणांच्या पाणलोटातही संततधार कायम आहे. उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे.
गुरुवारी रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट ‘ होता. तर उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. उर्वरित विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता.
एकूणच राज्यभरात पावसाने सर्वसामान्यांची चांगलीच दाणादाण उडवल्याचे दिसले. सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या १३ तुकड्या राज्यभरात तैनात ठेवल्याचे एनडीआरएफकडून सांगण्यात आले.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा राज्यातील पाऊस लांबणीवर गेला होता. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धडाक्यात आगमन केले. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात एकूण सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली. १७८ तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.
मुंबई-ठाण्याला २६ जुलैची झाली आठवण
मुंबई-ठाण्यात पावसाने गुरुवारीही संततधार सुरू ठेवली. त्यामुळे सखल भागांत पाणी साचून रेल्वे वाहतूकही मंदावली. मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल रेल्वेच्या फलाटांवर गर्दीच गर्दी दिसली. कल्याणसह अनेक स्थानकांच्या पटऱ्यांवर पाणी साचलेले दिसले. तर अनेक मार्ग खड्डेमय झाल्याने वाहतूकची गती कमी झाली. सर्वत्र ट्राफिक जाम झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, शुक्रवारीही पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे.
कोल्हापुरात परिस्थिती जैसे थे
जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी त्याचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी ४०.८ फुटांच्या आसपास स्थिरावली आहे. पावसाची संततधार कमी झाली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवल्याने महापुराचा धोका तूर्त तरी टळला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्याला यलो, त्यानंतर ग्रीन अलर्ट असल्याने पावसाची उघडीप होण्याची शक्यता आहे. परिणामी, पूरस्थिती नियंत्रणात येऊ शकते. गेल्या दोन दिवसांपासून ४० फुटांच्या आसपास पंचगंगा नदीची पाणीपातळी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळी राधानगरी धरणाचे पाच दरवाचे खुले केले होते, त्यामुळे कोल्हापुरात गुरुवारी दुपारपर्यंत पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात पाणीपातळीत केवळ तीन ते चार इंचांनी वाढ झाली आहे.
समाजमाध्यमांवर अफवांचे पीक
राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत, त्यामुळे कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर होईल. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत ४ ते ५ फुटांनी वाढ होईल, असे अंदाज बांधले जात होते. काही जणांकडून सोशल मीडियातून अफवा पसरवल्या जात होत्या; मात्र प्रत्यक्षात पंचगंगा नदीचे पाणी दोन दिवसांत केवळ ३ इंचांनी वाढले आहे. गुरुवारी रात्रभर पावसाची उघडीप राहिली, तर शुक्रवारी पाणी ओसरण्याचा अंदाज आहे…
धरण क्षेत्रात दमदार पावसाची बॅटिंग
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. तानसासह काही धरणे भरली असून उर्वरित धरणांच्या क्षेत्रातही स्थिती समाधानकारक आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची बॅटिंग जोरात सुरू आहे. पवना धरण ७३.५९ टक्के भरले आहे. असाच दमदार पाऊस मावळात सुरू राहिला तर काही दिवसांत पवना धरण शंभर टक्के भरेल, असा अंदाज आहे..