Monsoon 2023 :- मान्सूनचे केरळातील आगमनही तीन दिवस लांबणीवर पडणार आहे, त्यामुळे वर्षा ऋतूच्या प्रारंभिक वाटचालीच्या भाकिताने बळीराजासह सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. जून महिन्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या लांबतील किंवा दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते.
हवामानातील ला निना व अल निनो या घटकांवर भारतातील मान्सूनची वाटचाल अवलंबून असते. ला निनामुळे चांगला पाऊस पडतो, तर अल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होते. हवामान खात्याच्या पर्यावरण देखरेख आणि संशोधन केंद्राचे (ईएमआरसी) प्रमुख डी. शिवानंद पै यांनी शुक्रवारी मान्सूनच्या वाटचालीबाबतचा सुधारित अंदाज जारी केला.
त्यानुसार प्रशांत महासागरातील भूमध्य रेषेवरील भाग तापण्यास सुरुवात झाली असून अल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता ९० वाढली आहे. परंतु त्याचवेळी हिंद महासागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
त्यामुळे अल निनोचा प्रतिकूल प्रभाव असला तरी यंदा देशात सामान्य मान्सून राहील असे शिवानंद यांनी सांगितले. हवामान खात्याने यापूर्वी एप्रिल महिन्यात वर्तवलेल्या मान्सूनपूर्व अंदाजातहो चंदा सामान्य पाऊस पडेल, असे सांगितले होते. संपूर्ण हंगामासाठी सामान्य पावसाचा अंदाज असला तरी जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे
देशात जून ते सप्टेंबर या प्रमुख चार महिन्यांत दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. यामध्ये ५ टक्के कमी-अधिक होऊ शकते. एलपीएच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज म्हणजे दुष्काळाची भीती असते.
सरासरीच्या ९० ते ९६ टक्के पावसाचा अंदाज असेल तर सामान्यापेक्षा कमी पाऊस मानला जातो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के म्हणजे सामान्य पाऊस पडेल, असा अंदाज असतो. सरासरीच्या १०४ ते ११० टक्के म्हणजे सामान्यापेक्षा अधिक आणि ११० टक्क्यांहून अधिक म्हणजे अतिवृष्टी मानली जाते.
पेरण्या लांबण्याची शक्यता
सर्वसाधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होत असतो. परंतु यंदा ४ जून रोजी तो केरळात हजेरी लावेल, असा अंदाज आहे. म्हणजेच मान्सूनचे आगमन लांबणार आहे.
शिवाय सुरुवातीला पावसाचे प्रमाणदेखील कमी राहील. शेतकऱ्यांचे नियोजन यामुळे बिघडणार आहे. जून महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही, तर त्याचा पेरण्यावर परिणाम होईल. प्रेरण्या लांबतील किंवा दुबार पेरणी करावी लागू शकते.