Maharashtra Rain : शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेला नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे गुरुवार, ६ जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले. मान्सून सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूरमध्येही तो पोहोचला आहे.
राज्याच्या उर्वरित भागात पोहोचण्यास मान्सूनला पोषक हवामान असून, १० ते १४ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांशी भागात पाणीटंचाई जाणवत होती.

तसेच दुष्काळी परिस्थितीनंतर शेतकरी मान्सूनची वाट पाहत होते. त्यातच मान्सूनने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वेळेपेक्षा आधी राज्यात येत शेतकऱ्यांना दिलासा दिला. मान्सूनचे गुरुवारी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमन झाले.
मान्सूनने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलंगण, किनारी आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांत प्रगती केली, अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांशी भागात मान्सून पोहोचला. मान्सूनची सीमा गुरुवारी रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम, इस्लामपूर (प. बंगाल) भागात होती.
तसेच लवकरच संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापणार आहे. तसेच तेलंगण, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच २ ते ३ दिवसांत मान्सून पुणे, मुंबईपर्यंत प्रगती करणार आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मुदतपूर्व पावसाने हलका दिलासा दिला होता. मात्र, आता मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. गुरुवारी पुणे, जळगाव, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, धाराशीव, अकोला येथे पावसाची नोंद झाली.
राज्यभरात पावसाचा अलर्ट
येत्या १० जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, येथे सोसाट्याचा वारा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे