Panjabrao Dakh Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने काल अर्थातच 15 एप्रिल ला 2024 च्या मान्सूनचा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. यात यंदा मान्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात वेळेवर आगमन होणार आहे.
आठ जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच जुलै अखेरपर्यंत ला-निना सक्रिय होईल आणि यामुळे ऑगस्ट पासून सर्वत्र जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून काल वर्तवण्यात आला आहे.
निश्चितच, हवामान खात्याने यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता खऱ्या अर्थाने समाधान पाहायला मिळत आहे.
आता मान्सून केव्हा सुरू होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि आगामी खरीपसाठी शेतकऱ्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.
अशातच मात्र ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. या हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात आणखी पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 21 एप्रिल 2024 पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार आहे. या कालावधीत राज्यातील दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता असल्याचे पंजाबरावांनी म्हटले आहे.
एवढेच नाही तर या भागात पाऊस बरसणार असल्याने याचा परिणाम मराठवाड्यावर देखील पाहायला मिळणार आहे. यामुळे या काळात मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी दिला आहे.
खरेतर महाराष्ट्रात जवळपास सहा ते सात दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भात गेल्या सात दिवसांपासून पावसाने चांगलाच त्राहीमाम माजवला आहे. आता विदर्भातील वादळी पावसाचे सत्र थांबले आहे.
मात्र मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी काही दिवस अवकाळी पावसाचे सत्र असेच सुरू राहणार असे पंजाबरावांच्या हवामान अंदाजावरून स्पष्ट होत आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.