Heat Wave:- एप्रिल महिना सुरू झाला असून संपूर्ण भारतामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत असून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. अजून जवळपास उन्हाळ्याचे दोन ते अडीच महिने जायचे बाकी असताना आत्ताच ही स्थिती झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
त्यातच आता हवामान विभागाच्या माध्यमातून सोमवारी एक अंदाज वर्तवण्यात आला व त्यानुसार येणारे तीन महिने देशाच्या जवळपास 85 टक्के भागांमध्ये अतिशय तीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट येणार असून 2023 मधील 60 टक्क्यांपेक्षा यावर्षी उष्णता जास्त राहणार आहे.

एवढेच नाही तर येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये तापमानात तीन ते पाच अंशापर्यंत वाढ होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे.
उष्णतेच्या येणार 10 ते 20 दिवसांच्या तीन ते चार लाटा
सोमवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशामध्ये तीन महिने 85 टक्के भागात तीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट येणार असून पुढील आठवड्यात तापमानात तीन ते पाच अंशापर्यंत वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या सगळ्या स्थितीचा सर्वाधिक परिणाम हा राजस्थान, छत्तीसगड तसेच मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेश राज्यामध्ये जाणवणार आहे.
तसेच उष्णतेची ही स्थिती जून महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. या सगळ्या कालावधीत उष्णतेची लाट लागोपाठ वीस दिवस देखील राहण्याची शक्यता आहे.परंतु 23 राज्यांमध्ये ही उष्णतेची लाट 10 ते 20 दिवस राहणार आहे.
मागच्या वर्षी 31 मे 23 जून 2023 या कालावधीत मोठ्या कालावधीपर्यंत उष्णतेची लाट पाहायला मिळाली होती. त्यावेळी ती ओडिसा, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये लागोपाठ 21 दिवस होती. परंतु हवामान विभागाने यावर्षीचा जो काही अंदाज वर्तवलेला आहे
तो अनेक मॉडेलचे अनॅलिसिस करून वर्तवला असल्याने यावर्षीची उष्णतेची एक लाट देखील मागचे विक्रम मोडू शकते. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून तेवीस राज्य आणि 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
गुढीपाडव्यापूर्वी महाराष्ट्रातील या भागात अवकाळी पावसाचा अंदाज
कालपासून एप्रिल महिन्याची सुरुवात झाली व पहिलाच दिवस हा अतिशय उष्ण ठरला. त्यातील जवळपास 15 शहरातील तापमानाचा पारा हा 40° पर्यंत होता. सर्वाधिक 42 अंश डिग्री सेल्सिअस तापमान मालेगाव आणि जेऊरला नोंदवले गेले.
या सगळ्या उष्णतेच्या कालावधीमध्ये मात्र गुढीपाडवा सणाच्या अगोदर पाच ते आठ एप्रिल या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील खानदेश आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच विदर्भातील अकोला व काही शहरांमध्ये चार व पाच एप्रिल ला उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे.