कोकणासह राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra News : राज्यात पाऊस सक्रिय असून गुरुवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्र आणि त्यालगतच्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात रविवार, १९ मेदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत वातावरणातील खालच्या थरातील वारे विरळ झाले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत पुणे येथे ३.४ मि.मी., लोहगाव २, कोल्हापूर २,

महाबळेश्वर ६, सांगली ७, सातारा ३ तर चंद्रपूर येथे ४ मिमी पाऊस पडला आहे. तसेच इतर भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

गुरुवारी राज्यात कमाल तापमान जळगाव येथे ४२.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.६ अंश सेल्सिअस इतके होते. शुक्रवार, १७ ते शनिवार, १८ मे दरम्यान, कोकण,

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.