Unseasonal Rain: राज्यात होणार अवकाळी पावसाला सुरुवात! शनिवार ते सोमवार ‘या’ भागात राहील पावसाचे जास्त प्रमाण

Unseasonal Rain:- राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून पारा हा 40 ते 42 अंशांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सगळीकडे उन्हाचा प्रचंड तडाखा  जाणवत असून उकाड्याने नागरिक हैराण झाल्याची स्थिती आहे.

तसेच देशाच्या काही राज्यांमध्ये देखील तापमान प्रचंड प्रमाणात वाढल्याचे स्थिती असून बऱ्याच राज्यांमध्ये पारा हा 40° च्या पुढे आहे. या सगळ्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये शनिवार ते सोमवार या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

एवढेच नाही तर हवामान विभागाच्या माध्यमातून सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात  आलेल्या अंदाजानुसार पाहिले तर आज नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या स्वरूपामध्ये पावसाच्या सरी पडतील असा अंदाज आहे.

 शनिवारी कुठे आहे पावसाचा अंदाज?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि धाराशिव तर खानदेश पट्ट्यातील नंदुरबार, जळगाव आणि धुळे व त्यासोबतच नासिक, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 रविवारी कुठे आहे पावसाचा अंदाज?

त्यासोबतच रविवारी छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर,नांदेड,परभणी, धाराशिव आणि हिंगोली तर खानदेश पट्ट्यातील जळगाव, धुळे तसेच नंदुरबार व नाशिक, पुणे, सातारा,

सांगली, सोलापूर आणि विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 सोमवारी कुठे आहे पावसाचा अंदाज?

यासोबतच सोमवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील नाशिक, त्यासोबतच सोलापूर, सातारा, सांगली, पुणे आणि खानदेश या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.