Ahmednagar News : पाऊस, वारा, उष्णता, आर्द्रता अशी हवामानाची माहिती असणार भारतीय हवामान शास्त्र विभागाचे आयएमडीचे नगर जिल्ह्यातील एकमेव केंद्र राहुरी जवळील कृषी विद्यापीठानजीक कार्यरत असून या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना हवामान आधारीत सल्ला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.
मागील दोन महिन्यापूर्वी राहुरी, नगर जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यातच नुकतेच वादळाने हजेरी लावली. परिणामी, शेती व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाने पूर्वकल्पना दिल्याने शेतकरी सावध राहिले,
तरी देखील नुकसानीला सामोरे जावे लागले. सध्या उन्हाच्या काहीलीने सर्वजण त्रस्त आहेत. उष्णतेचा पारा चाळीस अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वत्र नागरिकांनी काळजी घेण्याबाबत सूचना जारी केल्या.
आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान शास्त्र विभागाचे हवामान केंद्र गेल्या अनेक दशकापासून या ठिकाणी कार्यरत आहे. या केंद्राच्या ठिकाणी हवामान शास्त्र विभागाने वेगवेगळी उपकरण तसेच अत्याधुनिक प्रकारचे स्वयंचलित यंत्रे कार्यान्वित केलेली आहे.
यामध्ये पर्जन्यमापक यंत्र, वात दिशादर्शक यंत्र म्हणजे वाऱ्याची दिशा दर्शवणारे यंत्र, आर्द्रता मापक यंत्र, हवेतील दमटपणा मोजणारे यंत्र, तापमापक, पायरेणू मीटर, स्वयंचलित व मापक यंत्र, उष्णता मापक, अशी दहा ते बारा उपकरणे तसेच स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रे कार्यान्वित आहेत.
शेती करण्यासाठी जमीन, वीज, पाणी आणि भांडवल गरजेचे. हे ज्याच्याकडे असेल, तो प्रगतिशील शेतकरी. ही आजवर प्रचलित झालेली व्याख्या सत्य असली, तरी यात आणखी एका गोष्टीची सुधारणा गरजेची आहे. या पाचही बाबींबरोबर हवामानाचा अचूक अंदाज ज्ञात असणे बदलत्या हवामानामुळे अत्यावश्यक बनले आहे.
तो माहिती नसेल, तर शेतीतले सर्व कष्ट पाण्यात जाऊ शकतात आणि स्थानिक हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाजवळ कार्यरत असलेले आय. एम. डी. चे हवामान केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
या संपूर्ण माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांना हवामान विषयक सल्ला देण्याचे देखील काम करण्यात येत असून अनेक व्हाट्सअप ग्रुप देखील शेतकऱ्यांचे करण्यात आलेले आहेत. नगर जिल्ह्यातील एकमेव हवामान शाख विभागाचे हवामान केंद्र असून या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून मोहनराव देठे हे काम पाहत आहेत.
असे चालते कामकाज
हवामान केंद्रातील यंत्रांमधून सकाळ- संध्याकाळ आकडेवारी घेऊन त्याची नोंद केली जाते व ती वरिष्ठ कार्यालयाला पुणे, मुंबई, नवी दिल्ली येथे पाठविली जाते. या ठिकाणी असणाऱ्या स्वयंचलित अत्याधुनिक यंत्राद्वारे माहितीचा डाटा थेट वरिष्ठ कार्यालयापर्यंत जमा होतो. त्यातील उपयुक्त माहिती ही सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येते.