अहमदनगर :- माझी लोकसभेची हौस फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही. औटी अभ्यासू आहेत. त्यांचे हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. त्यांनी लोकसभा लढवावी. मी त्यांचे काम करेन, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगताच कर्डिले मुरब्बी आहेत. मला पुढे काढून दिले म्हणजे मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांना वाटत असेल. पण मी लोकसभा लढणार नाही, असे प्रत्युत्तर औटींनी दिले.
निमगाव घाणा येथील विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी आणि आमदार कर्डिले यांची जुगलबंदी पहावयास मिळाली. या वेळी पं. स. सदस्य डॉ. दिलीप पवार, रवी शिंदे, संभाजी पवार, संजय गेरंगे, बी. डी. कोतकर, लक्ष्मण नरवडे, भाऊसाहेब लांडगे, अंबादास शेळके, विकास रोहकले आदी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, औटी यांना कायद्याचे मोठे ज्ञान आहे. ते लोकसभेत गेले, तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. मला इंग्रजी, हिंदी येत नाही. मी दिल्लीत गेलो, तर मोठा प्रश्न निर्माण होईल. औटींनी शिवसेनेकडून लोकसभा लढवावी, मी पाठिंबा देईन. तुम्ही विधानसभेचे उपाध्यक्ष आहात. मला विधानसभेत बोलायला जास्त वेळ द्या, असेही कर्डिले म्हणाले.













