मुलीसोबत भांडण केल्याच्या रागातून सासूने जावयाच्या तोंडात ओतले विष!

अहमदनगर :- मुलीसोबत भांडण केल्याच्या रागातून सासूने जावयाला आणखी एका महिलेच्या मदतीने मारहाण करून तोंडात विष ओतले.

नवनागापूर येथील पितळे कॉलनीत 8 जुलै रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी (दि.22) रात्री उशिरा सासूसह एका महिलेविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .

मंगल आव्हाड (रा. पितळे कॉलनी, नागापूर) असे आरोपी सासूबाईचे नाव असून मनिषा नावाची आणखी एक महिला यावेळी सासूबाई सोबत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भाऊसाहेब प्रभाकर साबळे (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे विषाचा प्रयोग झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनीच पोलिसांत फिर्याद दाखल केली.

जावई भाऊसाहेब हे नेहमीच मुलीशी भांडण करतात. त्याचा राग मनात धरून त्यांनी जावयाच्या खुनाचा प्रयत्न केला.

पितळे कॉलनीतील घरी बोलावून जावई भाऊसाहेब यांंना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.

त्यानंतर सासूबाई मंगल आणि मनिषा या दोघींनी त्यांच्या तोंडात काहीतरी विषारी औषध टाकल्याचे साबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी सासूबाई मंगल आव्हाड आणि मनिषा या दोघीविरोधात खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.