अहमदनगर : उत्कृष्ट कामगिरीची ओळख असलेल्या साखर कारखान्यांमध्ये डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर करखाना अग्रेसर होता. कारखान्याच्या स्थापना काळापासूनच जिल्हा बँकेने कारखान्यास पतपुरवठा केला.
कार्यक्षेत्रात अंदाजे वीस लाख टन उसाचे उत्पादन असूनही कारखाना मात्र बंद आहे. मधल्या काळात शेतकरी, कामगारांची कामधेनू पुनर्जीवित होण्यासाठी बँकेने सहकार्य केले. मात्र, कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ होत आहे.

या परिस्थितीत थकीत रक्कम शंभर कोटींच्या पुढे जाऊन बँक अडचणीत येईल, त्यामुळे नियमानुसार कारवाई अपरिहार्य आहे. मात्र, शेतकऱ्यांची कामधेनू टिकावी हीच जिल्हा बँकेची भावना असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी केले.
दरम्यान मा. आ. शिवाजी कर्डिले यांनी विखे पिता-पुत्र यांच्यावर टिकेची तोफ डागली. डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन गायकर बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक मा. आ.शिवाजीराव कर्डिले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, सरव्यवस्थापक किशोर भिंगारकर, प्राधिकृत अधिकारी तथा सरव्यवस्थापक सिद्धार्थ वाघमारे, जनसंपर्क अधिकारी भारत पाटील आदी उपस्थित होते. तनपुरे साखर कारखाना थकीत कर्जामुळे अडचणीत आला आहे.
त्यातच यावर्षी कारखाना सुरू झालेला नाही. थकीत पगार त्यासंदर्भात कारखान्याचे कर्मचारी देखील आंदोलनाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे चेअरमन गायकर यांनी सांगितले.
शेतकरी व कामगारांची कामधेनू असलेला तनपुरे कारखाना सुरू राहावा, ही आपली लोकप्रतिनिधी म्हणून स्पष्ट भूमिका होती. थकीत कर्जापोटी बँकेने ताब्यात घेऊन विक्री करू नये, यासाठी जिल्हा बँकेचा संचालक म्हणून आपण पुढाकार घेतला.
पुढे कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच इच्छा होती. हा कारखाना चांगला चालावा म्हणून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील या दोघांनी विनंती केल्यानुसार कारखाना संचालकांच्या ताब्यात देऊन सुरू करण्याचे प्रयत्न केले.
मात्र आता ४२ कोटी थकले. तसेच कामगारांचेही पगार थकवले. कारखाना सुरु करण्याबाबत घेतलेला पुढाकार केवळ लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून होता की काय ? राजकीय हेतूनेच तनपुरे ताब्यात घेतला का ? असे प्रश्न उपस्थित करीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राधाकृष्ण विखे पा. व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर शरसंधान केले.
कर्डिले म्हणाले, एकीकडे कारखाना सुरू करायचा नाही, मात्र थकबाकीमुळे कारवाई झाली, की बँकेवर ठपका ठेवायचा. असा प्रयत्न यात दिसतो. लोकसभेची निवडणूक झाली की त्यांना हात वर करायचे होते, हे लक्षात आले नाही.
मात्र, तनपुरे कारखान्याला केलेली मदत ही विखे यांना लक्षात ठेवून केली नव्हती. शेतकरी व कामगारहिताच्या दृष्टीनेच केली होती. कारखान्याचे संचालक मंडळ नामधारी आहे. त्यांचा कर्ता-करविता कोण, हे सर्वांना माहीत आहे.असे कर्डिले म्हणाले.













