कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 : कुठल्याही परिस्थितीत राज्यातील सरकार अडचणीत यावं, यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली की, त्यांना वाईट वाटतं, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी भाजपवर केली.

कोरोना आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यावेळी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, कुकडी धरणातून पाणी सोडण्यासाठी माजी मंत्री राम शिंदेंनी उपोषण केले. धरणातून पाणी सोडण्याबाबत कुणीही राजकारण करू नये. मला एक फोन केला, तरी सर्व प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला कोरोना उपाययोजना करण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे.

त्याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्रातील मंत्री सांगताहेत कोरोना नियंत्रणात आहे आणि दरेकर सांगतात, कोरोना नियंत्रणात नाही. खरं कोण बोलतंय, नरेंद्र मोदी की दरेकर?

कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातलं सरकार अडचणीत यावं, यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. बाधित रुग्ण कमी झाले किंवा मृत्यू कमी झाले की, त्यांना वाईट वाटतं, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांनादेखील धान्य उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्हा बँकांसह अन्य खासगी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे.

बारा बलुतेदार म्हणून काम करणाऱ्या लोकांना गेल्या काही दिवसांपासून हाताला काम नाही. त्यामुळे त्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews