वडिलांच्या अनैतिक संबंधाचा मुलाला आला राग, आणि केला वडिलांचा खून…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- खून करून कुकडी नदीपात्रात २७ ऑगस्टला टाकलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली. 

अनैतिक संबंध व त्यातून वडिलांचे कुटुंबाकडे होत असलेल्या दुर्लक्षास कंटाळून मुलानेच पित्याचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. 

प्रदीप सतीश कोहकडे (कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याने वडील सतीश सदाशिव कोहकडे (वय ४९) यांचा चार मित्रांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी प्रदीपचे साथीदार हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही कारेगाव) यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश कोहकडे यांचे अनैतिक सबंध होते.

कोहकडे यांच्या कारेगावमध्ये ४० खोल्या असून त्याचे महिन्याचे भाडे सुमारे एका लाख रूपये, तसेच शेतीचे उत्पन्न वडील अनैतिक सबंध असलेल्या महिलेवरच खर्च करत होते.

२३ ऑगस्टला सायंकाळी घरात भांडण झाले. सतीश यांनी पत्नीस मारहाण केली. मारहाणीनंतर पत्नी मुलीकडे निघून गेली. आईस मारहाण केल्याचा राग प्रदीपच्या डोक्यात होताच. त्याच दिवशी वडिलांचा काटा काढण्याचे त्याने निश्चित केले.

मित्रांना बरोबर घेऊन प्रदीप त्याच रात्री बाराच्या सुमारास घरी आला. आत घुसताच मिरची पूड वडिलांच्या डोळयात टाकली. ते आरडाओरडा करू लागताच एकाने त्यांचे तोंड दाबले.

तिसऱ्याने हात धरून एकाने कमरेच्या पट्टयाने सतीश यांचा गळा आवळला. गाडीत मृतदेह टाकून पहाटे तो कुकडी नदीपात्रात टाकण्यात आला. दुसऱ्या दिवशी सर्वजण पुन्हा नदीपात्राजवळ गेले. मृतदेह वाहून जाईल, असे त्यांना वाटले होते.

मात्र, मृतदेह तेथेच असल्याने ते हादरले. गाडी इथे राहिली तर संशय येईल असे वाटल्याने रात्री गाडी करडे (शिरूर) घाटात नेऊन टाकण्यात आली.

करडे घाटात कार सापडल्यानंतर घटनेची उकल होऊ लागली. प्रदीप व मित्र २३ रोजी मध्यरात्री कारमध्ये फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले.

प्रदीपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सर्व घटनाक्रमाचा खुलासा केला. वडिलांचा खून करून नदीपात्रात मृतदेह टाकणाऱ्या मुलासह त्याच्या दोघा मित्रांना अटक करण्यात आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved