सहा महिन्यापुर्वी झालेल्या रस्त्याची दुरावस्था अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागास टाळे ठोकण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट गावा पर्यंतचा (बायपास) रस्त्याचे सहा महिन्यापुर्वी झालेले काम अत्यंत निकृष्ट झाले असून, सदर कामाची पहाणी करुन रस्ता दुरुस्तीची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे, जिल्हा सहसचिव संतोष त्रिंबके, संतोष उदमले, दीपक गुगळे, अमित गांधी, सागर शिंदे, मिनाज कुरेशी, वजीर सय्यद,

गणेश निमसे, गौरव बोरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. नगर-सोलापूर रोड वरील वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट पर्यंन्त रस्ता सहा महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या 10 किलोमीटर रोड साठी 2.5 कोटी आणि पुढील 8 किलोमीटर रोड साठी 1 कोटी असा 18 कि.मी. साठी तब्बल 3.5 कोटी निधी मंजूर झाला होता.

डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी रोडच्या बाजूने अद्याप गटारीचे काम करण्यात आलेले नाही. या रोड च्या दरम्यान साधारण तीन पुल लागतात. या पुलावर कुठल्याही प्रकारचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. वाकोडी फाट्यावरून पुढे जात असताना लागणारा पहिला पूल हा पूर्णपणे खचला आहे.

तरीही या पुलावरून अवजड वाहनांची वाहतुक सुरु आहे. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस कठडे देखील बसवलेले नाहीत. तसेच जीर्ण झालेल्या पुलामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात होण्याचा धोका आहे. सहा महिन्यात अर्ध्याच्यावर रोड अनेक ठिकाणी खराब झाला आहे.रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारास कोणत्या निकषावर बिल अदा करण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर रस्त्याची पहाणी करुन दोषी ठेकेदाराची चौकशी करुन खराब झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved