IndiaPolitics

तरुणांनी देशाच्या गरजा ओळखून बदल स्वीकारावे- पंतप्रधान

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- तरुणांनी देशाच्या गरजा लक्षात घेऊन तळागाळापर्यंत होणा-या बदलांशी जोडून घ्यावेत. आत्मनिर्भर भारताच्या संदर्भात सर्वसामान्यांच्या आकांक्षा जाणून घेण्याची गरज असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयआयटी दिल्लीच्या 51 व्या दीक्षांत समारंभाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना ते आज, शनिवारी बोलत होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर मोहीम ही एक मिशन आहे, त्यामुळे देशातल्या तरूण तंत्रज्ञ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांना संधी देत आहे, असे सांगितले. आज नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून त्याची अंमलबजावणी करणे, नवसंकल्पनांना मुक्तपणे प्रत्यक्षात आणणे तसेच त्यांचे प्रमाण वाढवून बाजारपेठ निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण सध्या असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

आजचा भारत आपल्या युवकांना उद्योग सुलभता प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे त्यांना नवसंकल्पांच्या माध्यमातून कोट्यवधी देशवासियांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य होणार आहे. ”देश तुम्हाला उद्योग सुलभता प्रदान करतोय आता तुम्ही फक्त देशातल्या लोकांचे जीवनमान सुकर बनवायचे आहे”, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. अलिकडच्या काळामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या सुधारणा घडवून आणल्या आहेत, त्यामागे एक विशिष्ट विचार प्रक्रिया आहे,

असे स्पष्ट करून पंतप्रधान म्हणाले, या सुधारणांमुळेच पहिल्यांदाच नाविन्य आणि नवीन स्टार्ट-अप्ससाठी ज्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, त्याची एक यादी पंतप्रधानांनी यावेळी सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात ओएसपी म्हणजे अन्य सेवा प्रदाता मार्गदर्शक तत्वांचे सरलीकरण केले आहे. बीपीओ व्यवसायावर अतिरिक्त भार कमी करण्यासाठी अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. आता बीपीओ व्यवसायालाही बँकेच्या हमीसह इतर विविध गोष्टींची आवश्यकता असणार नाही. अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञाना उद्योगाला ‘वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम एनिव्हेअर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातले आयटी क्षेत्र जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणार आहे आणि तरूणांच्या प्रतिभेला अधिक संधी मिळू शकणार आहे. कॉर्पोरेट कर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारत एक असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, स्टार्ट-अप इंडिया मोहिमेनंतर देशामध्ये 50 हजारांहून जास्त स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जात असल्याचा परिणाम म्हणजे,

देशात गेल्या पाच वर्षात आपल्या नवीन उत्पादन-सेवेचे बौद्धिक स्वामित्व -पेटंट घेणा-यांच्या संख्येत चैापट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच व्यवसायाचा ट्रेडमार्क नोंदविणाऱ्यांच्या संख्येमध्ये पाचपट वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात 20 पेक्षा जास्त भारतीय युनिकॉर्नची स्थापना झाली आहे. तसेच येत्या एक-दोन वर्षात ही संख्या आणखी वाढणार आहे. आता आपल्याकडे इनक्यूबेशनपासून ते स्टार्टअप्सपर्यंत वित्तीय मदत केली जाते, असे निदर्शनास आणून देत पंतप्रधानांनी देशात स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात आला आहे, हे स्पष्ट केले.

या व्यक्तिरिक्त स्टार्टअप्सना पहिल्या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक प्रकारच्या कर सवलती देण्यात येत आहेत. स्वप्रमाणन आणि सहजपणे बाहेर पडता येण्याची सुविधाही यामध्ये आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक देशात करण्यात येणार असून त्याची संपूर्ण योजना तयार झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे वर्तमान आणि भविष्यांमध्ये देशांच्या असलेल्या गरजा पूर्ण होवू शकणार आहेत. देश आता नवनवीन मार्गांनी प्रत्येक्ष क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व विद्यार्थी वर्गाने आपल्या कामाच्या ठिकाणी चार मंत्र जपावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला.

  • 1. गुणवत्तेकडे लक्ष केंद्रीत करावे, त्यामध्ये कधीच तडजोड करू नये.
  • 2. प्रमाणता सुनिश्चित करावी. आपल्या नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणावर काम करावे.
  • 3. विश्वासार्हतेची हमी देवून बाजारपेठेमध्ये प्रदीर्घकाळापर्यंत स्थान कायम ठेवावे.
  • 4. अनुकूलनता, नवीन बदलांना स्वीकारण्यासाठी तसेच जीवनामध्ये अस्थिरताही येणार आहे, हे लक्षात घेवून लवचिक धोरणासह मुक्त जीवनशैली ठेवा. या चार मुलभूत मंत्रांनुसार तुम्ही काम केले तर तुमची कामगिरी चमकदार होईल आणि तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होवून भारताचे ‘ब्रँड’ बनू शकणार आहे,
  • असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. वास्तविक भारताचे विद्यार्थी हे बाहेर देशाचे सर्वात मोठे ब्रॅंड अँबेसेडर आहेत. विद्यार्थ्‍यांनी केलेली कामे देशाच्या उत्पादनाला जागतिक मान्यता देणारे आहे आणि त्याचबरोबर देशाच्या प्रयत्नांना वेग देईल, असेही मोदी यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button