अनेक शिक्षकांनाही झाला कोरोना, विद्यार्थ्यांचे काय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या सणात शिथिल झालेल्या बंधनांमुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीच्या निमित्ताने रस्त्यावर आले. मंदिरे खुली झाल्याने अधिकच गर्दी उसळली. या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली.

त्यातच शाळा सुरु करण्याच्या निर्णयामुळे कोविड तपासणी करताना अनेक शिक्षकही पॉझिटिव्ह आढळू लागले. त्यामुळे गाफिलपणा सोडून प्रशासनाने सतर्क व्हावे, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार कार्यालयात आयोजित बैठकीत कानडे बोलत होते.

यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, आयपीएस पोलिस अधिकारी आयुष नोपाणी, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्याधिकारी मोहन शिंदे, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, सार्वजनिक बांधकामचे नितीन गुजरे उपस्थित होते. कोरोनाची वाढत असतानाही नागरिक मास्क वापरत नाहीत.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर साथीचा फैलाव होऊ नये, म्हणून मास्क वापरणे तातडीने बंधनकारक करावे, बाजारपेठेतील दुकानदार व कामगारांच्या कोरोना चाचण्या करुन घ्याव्यात. जेवढे लवकर निदान होईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सुविधा देता येतील.

ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचारांची सोय झाल्याने चाचणी करुन घेण्यासाठी घाबरु नये, असा संदेश जनतेमध्ये गेला पाहिजे, असे आमदार कानडे यांनी संबंधितांना सांगितले. राज्य शासनाने येत्या २३ पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. कोरोनाबाबत सध्याच्या परिस्थितीचा आपण आढावा घेतला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार लहू कानडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved