किरकोळ कारणावरून महिलेचा खून …! 

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  संगमनेर तालुक्यातील कर्‍हे शिवारातील मल्हारवाडी येथे किरकोळ कारणावरून जबर मारहाण करून एका महिलेचा खून केला होता. मंगल भाऊसाहेब पथवे (वय ४५,रा.उंच खडक ता.अकोले ) असे त्या मृत महिलेचे नाव होते. सोमवारी सकाळी ही उघडकीस आली. 

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अहमदनगर येथील श्वान पथकाला पाचारण केले. यातील ‘रक्षा’ नावाच्या श्वानाने तेथे उपस्थित असलेल्या आरोपीला शोधले. यामुळे अवघ्या दोन तासांत गुन्ह्यातील आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी कर्‍हे शिवारातील मल्हारवाडी येथील चारी क्रमांक चारलगत असलेल्या शेतात अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले होते. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजताच तत्काळ पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पथकासह धाव घेतली.

त्यानंतर प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार तपासाची चक्रे फिरवत अहमदनगर येथील श्वान पथकास पाचारण केले. या पथकातील रक्षा नावाच्या श्वानाने घटनास्थळाचा मागोवा घेवून तेथे उपस्थित असलेल्या राजू शंकर कातोरे याच्यावर जोरजोराने भुंकण्यास सुरुवात केली.

यामुळे खुनातील खरा आरोपी पकडला गेला. मयत महिला मंगल वामन पथवे ही व आरोपी कातोरे याच्याबरोबर कर्‍हे येथील शेतकरी रामदास म्हातारबा सानप यांच्याकडे वाट्याने शेती करत होते.तसेच त्यांना दारू पिण्याची सवय होती.

या प्रकरणी पोलीस शिपाई अनिल जाधव यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन राजू शंकर कातोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या दोन तासांत या गुन्ह्याचा छडा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार विजय खंडीझोड, इस्माईल शेख, मुख्य हवालदार पारधी, पोलीस नाईक ज्योती दहातोंडे, बाबा खेडकर, अनिल जाधव, राजेंद्र घोलप, ओंकार शेंगाळ, वंदना वाकचौरे यांनी श्वान पथकाच्या मदतीने लावला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर