अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत,कोणत्याही रुग्णास उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणून आ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे.

सध्या कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कर्जत आरोग्यविभाग आणि स्थानिक प्रशासन जीव ओतून काम करत आहे.
आ.रोहित पवार यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आरोग्यासाठी मतदारसंघात गरजेनुसार जम्बो कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे.
या सेंटरमध्ये हजारो रुग्णांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.या सेंटरसाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा वेळेत मिळवण्यासाठी त्यांच्याकडुनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्यशासनाकडून आरोग्य सुविधांकडे लक्ष दिले जात आहे.रुग्णांना तात्काळ सुविधा मिळाव्यात,
त्यांना अत्यावश्यक उपचारासाठी घेऊन जाणे,त्यांना उपचाराच्या ठिकाणाहून पुन्हा घेऊन येणे शक्य व्हावे यासाठी ही रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहे.
याअगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने कर्जत व जामखेडसाठी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.
आता आमदार फंडातून रोहित पवारांनी ही तिसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान होणार आहे.
१०८ आणि १०२ या टोलफ्री क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिकेसोबतच ही रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













