अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्न असलेला पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी प्रयत्नशील असलेले स्वयंसेवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे अधिकाऱ्याांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासंदर्भातच निर्णय वरिष्ठ पातळीवरचा असल्याने आंदोलकांनी या बैठकीतच दि.१३ मार्च रोजी रेल्वे रोकोचा इशारा दिला. अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने सदरचे आंदोलन घोषित करण्यात आले असून,
यामध्ये पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हरदिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाऊंडेशन, फिनिक्स सोशल फाऊंडेशन संघटना सहभागी होणार आहे.
नगर-पुणे शहरांना जुळ्या शहरांचा दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी व नगर शहरातील औद्योगिक, व्यापार, रोजगार व विकासाला चालना देण्यासाठी मागील दहा वर्षापासून सत्याग्रही व स्वयंसेवी संघटनेची पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी सातत्याने सुरु आहे.
रेल्वे विभागाने दौंड येथे ३० कोटी रुपये खर्च करुन कॉड लाईनचे काम पुर्ण केले. कॉड लाईनचे काम पुर्ण झाल्याने रेल्वे दौंड स्टेशनवर इंजन बदलण्यासाठी न थांबता दोन तासात पुण्याला पोहोचणार आहे.
ही रेल्वेसेवा नगरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सदर रेल्वेसेवा सुरु न केल्यास रेल्वे रोको करण्याचा ईशायाचे निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पाठविण्यात आले.
सदर प्रश्न रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करुन मार्गी लावण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचे शिष्टमंडळ खासदार डॉ. सुजय विखे यांची भेट घेणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved