वीजपंपाची मोडतोड करून तांब्याच्या तारा चोरटयांनी केल्या लंपास

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात सध्या चोरट्यांचाच बोलबाला आहे. पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे कि चोरटे अधिक चालाख झाले याबाबत तर संभ्रमच आहे.

मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागला आहे. कारण चोरीच्या घटना दरदिवशी सुरूच आहे मात्र चोरट्याने पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

नुकतेच कर्जत तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील भीमा नदीपात्रात बसवलेल्या सहा वीज पंपांची मोडतोड करण्यात आली.

थ्री फेज वीज गेल्यानंतर विजपंपांची तोडफोड करून त्यामधील अंदाजे पंचवीस हजार रूपये किंमतीची तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये पाईप,

मोटार बॉडी, रोटर इत्यादींचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भीमा पट्ट्यातील दुधोडी, सिद्धटेक, बेर्डी हद्दीत वारंवार या घटना घडत आहेत.

परंतु आता या चोरांनी भांबोरा हद्दीत ही मोटार चोरीस सुरुवात केली आहे. या विषयासंबंधी राशीन व कर्जत पोलीस स्टेशन येथे अनेक शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत.

दुधोडी येथील घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी कारवाई केल्यानंतर सहा महिने चोरी सत्र थांबल्याने शेतकरी निश्चिंत होते.

मात्र या घटनेने शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. या घटना वारंवार घडत असल्याने यामध्ये परीसरातील सराईत मोटार चोर असावा, अशी चर्चा आहे.

चोर शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नात कर्जत पोलिसांनी लक्ष घालून चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.