अहमदनगर : सोमवारी लोकशाहीच्या उत्सावातील मतदान संपन्न होत आल्यानंतर जिल्ह्याच्या शिवारात चित्रा नक्षत्रांच्या सरींनी बरसातीचा उत्सव साजरा केला. अंतिम चरणातील चित्रांच्या सरींनी सोमवारी सर्वदूर हजेरी लावली.
९७ पैकी ८० महसूल मंडलांत हजेरी लागतानाच कोळगाव व पारनेर या दोन ठिकाणी अतिवृष्टी झाली. बाकी उर्वरित १७ मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले. रब्बी हंगामासाठी चित्रांच्या सरींनी दिलासा दिला. परतीच्या वाटेवरचा हा पाऊस शिवारास पावला. .
मागील सालात जिल्ह्याच्या शिवारावर पावसाने रुसवा धराला. त्यामुळे खरीप- रब्बीची खळी बुडाली. चारा, पाण्याचे भीषण संकट जिल्ह्यापुढे उभे ठाकले होते. जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केला होता. त्यावर पशुधनाला आधार देण्यासाठी २५ जानेवारीस चारा छावण्यांना सरकारने मंजुरी दिली.
फेब्रुवारीपासून जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना अटी-शर्तींसह ग्रीन सिग्नल देत ५११ छावण्यांना मंजुरी होती. त्यापैकी १जूनपर्यंत ५०४ चारा छावण्या सुरू झाल्या. या छावण्यांच्या छताखाली तब्बल ३ लाख ३६ हजार पशुधन दाखल झाले होते. टॅंकरच्या संख्येने मागील १७ वर्षांचा सर्वोच्च आकडा गाठला. दुष्काळाचा हा दाह तीव्र होत असताना पावसाळा सुरू झाल्यानंतर रोहिणी, मृग नक्षत्रांचा अपवाद वगळता सर्व हंगाम कोरडा गेला. आद्र्रा नक्षत्रात सरी बरसल्या.
नंतर पुनर्वसू, आश्लेषा आणि मघा नक्षत्रात पाऊस झाला. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाने जिल्ह्यातील शिवाराचा दुष्काळ काहीसा हलका केला. अनेक ठिकाणच्या छावण्या बंद झाल्या. तसेच टँकरची संख्याही घटली. आता मागील आठवड्यापासून कमी अधिक प्रमाणात चित्रा नक्षत्राच्या सरी बरसू लागल्यात. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध मंडलांत पावसाची हजेरी लागली. पावसाने शिवाराला दिलासा दिला. या पावसाने रब्बीच्या पिकांना संजीवनी मिळाली.
मात्र हा पाऊस अनेक ठिकाणी पुरेसा नसल्याचे स्पष्ट होते. कर्जत तालुक्यात अद्यापि १५ चाराछावण्या सुरू आहेत. या छावण्यात दाखल असलेले १० हजार पशुधन जगविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यासाठी प्रतिदिन साडेआठ लाख रुपये खर्च होत आहे.
हीच स्थिती पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संदर्भात आहे. जिल्ह्यातील ९८ गावे व ४९० वाड्यावस्त्यांवरील २ लाख ४ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या १४२ टॅंकरची धावाधाव सुरूच आहे.
पाणीसाठ्यातील टक्केवारी.
भंडारदरा : १००.
मुळा : १०० .
आढळा : १००.
निळवंडे : ९६.३६.
मांडओहोळ : ९२. ८६.
सीना : ४१.५८ .
खैरी : ०३. १७.
घाटशीळ : शून्य .
तालुकानिहाय टँकर.
पाथर्डी : २९.
कर्जत : ४६.
जामखेड : ६७.