अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-मंच कोणताही असो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप तसेच टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
आज जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ नांगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपवर कडकडून टीका केली आहे.
देशातील सध्याची स्थिती पाहता ‘प्रत्येक गोष्टीत भाजप अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण करीत आहेत. देशात सर्वत्र भाजपच्या विरोधातील आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही राजकारण खेळले जात आहे. येथेही भाजपच्या विरोधातील लोकांच्यामागे ‘ईडी’ची चौकशी लावली जात आहे.
आमची आता खात्री झाली आहे की, हे प्रकार सातत्याने सुरू असून यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच आहेत,’ असा सनसनाटी आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
‘ राज्यात वाढत असलेल्या या प्रकारांकडे राज्य सरकार आता गंभीर्याने पहात असून यासंबंधी लवकरच कायदा केला जाणार आहे.
‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या केंद्रीय संस्थांचा राजकीय हेतुने वापर करणाऱ्यास प्रतिबंध करणारा कायदा राज्यात महाविकास आघाडी सरकार आणणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले कि, पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.
केवळ संशय आणि आरोपावरून कोणाला असे आयुष्यातून उठविले जाऊ नये. पूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतीतही असाच प्रकार झाला होता. शेवटी ती तक्रारच मागे घेतली गेली.
या प्रकरणातील सत्यही लवकरच बाहेर येईल. मात्र, भाजपच्या मंडळींना महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची खूपच घाई झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशा घटनांचे भांडवल करून निराधार आरोप केले जात आहेत’.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved