नगर-मनमाड राज्यमार्गावरील खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- नगर- मनमाड हा राज्य महामार्ग अनेक दिवसांपासून खराब झाला आहे. या राज्यमार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यात आतापर्यंत अनेक जणांचे प्राण गेले आहे. असाच एक अपघात सावळीविहीर परिसरात घडला.

कोपरगाव येथे संजिवनी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक असलेले व देवळाली प्रवरा येथील रहिवासी असलेले ऋषीकेश विजय भागवत यांचा या अपघातात बळी गेला आहे.

बचावासाठी त्यांनी हेल्मेटही घातले होते; मात्र अपघात असा होता की यात हेल्मेटचा काहीही उपयोग झाला नाही. खड्डा चुकविताना एका अवजड वाहनाच्या खाली सापडून ते जागीच ठार झाले. नगर- मनमाड हा राज्य महामार्ग अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. पूर्वी हा रस्ता खासगी कंपनीकडे होता.

त्यासाठी ही कंपनी टोल वसूल करीत होती. तोपर्यंत या रस्त्याची काही प्रमाणात का होईना डागडुजी होत होती. परंतु जशी या टोल कंपनीची मुदत संपली, या कंपनीने डागडुजी करणे सोडून दिले. त्यानंतर हा महामार्ग दिवसेंदिवस खराब होत गेला. त्याप्रमाणे अपघातांची व त्यात बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढत गेली.

या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी अनेक आंदोेलने झाली. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला; मात्र निधीचे कारण देत सरकारने हा मार्ग काही दुरुस्त केला नाही. तेव्हापासून आतापर्यंत अनेक लोकांचे बळी या मार्गाने घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe