दख्खनच्या पठारी प्रदेशातील नापीक जमिनींचा औद्योगिक विकासासाठी वापर व्हावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- महामार्गालगत असलेल्या दख्खनच्या पठारी प्रदेशात नापीक जमिनींचा औद्योगिक विकासासाठी वापर करण्याच्या मागणीकरिता पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मुनौपूना डोंगरी औद्योगिक क्षेत्र विकासाचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे मांडण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

नगर-मुंबई, नाशिक-पुणे, पुणे-औरंगाबाद या महामार्गालगत दख्खनच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात असलेल्या नापीक पड जमिनी औद्योगिक विकासाखाली आनण्याची गरज आहे. ही योजना लॅण्ड पुलिंग योजनेच्या माध्यमातून साकारली जाऊ शकते. माळरान जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना दिलेल्या जमीनीच्या प्रमाणात 30 टक्के विकसीत औद्योगिक भूखंड परतावा म्हणून मिळणार आहे. 40 टक्के जागा अमेनिटी प्लॉट, रस्त्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

तर 30 टक्के जागा बीओटी तत्वावर देऊन औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची तरतूद या प्रस्तावात आहे. सरकारने फक्त वीज, पाणी व रस्ते या मुलभूत सुविधा निर्माण करुन दिल्यास या जमीनीवर जलदगतीने औद्योगिक विकास साधला जाणार आहे. मुनौपूना म्हणजेच मुंबई, नगर, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांचे प्रथम अक्षर एकत्रित करुन या योजनेला नांव देण्यात आले आहे.

पठारी प्रदेशात नापीक जमिनींवर औद्योगिक वसाहती निर्माण झाल्यास ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. तर खडकाळ पड जमिनीचा योग्य उपयोग होऊन दुष्काळी भागातील गावांचा देखील विकास साधला जाणार आहे. कमी पैश्यात हे भूखंड मिळणार असल्याने अनेक भारतीय उद्योजक व आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कमी पाणी लागणार्‍या कारखान्यांना तसेच आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने निर्माण करणार्‍या कंपन्यांसाठी ही जागा सोयीची ठरणार आहे. औद्योगिक विकेंद्रीकरणाचा हा भाग असून, राज्य सरकारने भौतिक सुविधा निर्माण करुन दिल्यास लॅण्ड पुलिंगद्वारे या खडकाळ पड जमीनीचा उपयोग औद्योगिक विकासासाठी करण्याची काळाची गरज असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

मुनौपूना डोंगरी औद्योगिक क्षेत्र विकासासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, अर्शद शेख, जालिंदर बोरुडे, ओम कदम, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, अंबिका नागूल, वीरबहादूर प्रजापती आदी प्रयत्नशील आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe