अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना भाजप एक मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचे माजी कप्तान आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रविवारी (७ मार्च) भाजपात अधिकृतरित्या प्रवेश कऱण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत रविवारी कोलकात्याच्या ऐतिहासिक परेड ग्राऊंडवर भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेतच सौरव गांगुली भाजपात अधिकृत प्रवेश करतील, अशी माहिती मिळतेय. सौरव गांगुलीसह अभिनेते मिथून चक्रवर्ती, प्रोसेनजित यांच्यासह इतर काही सेलेब्रिटी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिलीय.
मोदी आणि शाह या जोडीनं २०१९ पासूनच सौरव गांगुलींना भाजपात आणण्याची योजना आखल्याचं सांगितलं जातंय. अमित शाह यांनी सर्वप्रथम सौरव गांगुलींना बंगाल क्रिकेट असोसिएशनमधून मुक्त करत बीसीसीआयचं अध्यक्ष बनवलं. त्याच वेळी अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव झाले.
त्यानंतर जय शाह यांनी ही मोहिम पुढे सुरू ठेवली. नुकतीच बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची गांगुलींनी भेट घेतली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ते भेटले. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सौरव गांगुली भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.
मात्र भाजपकडून किंवा सौरव गांगुलींकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया येत नव्हती. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे मुख्यमंत्री होतील आणि सौरव गांगुलींना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल, अशी चर्चा आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|