आश्चर्यम‌् ! दोन दशकांनंतर सापडलं यात्रेत चोरी गेलेले मंगळसुत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- यात्रेत चोरी गेलेले मंगळसुत्र तब्बल २२ वर्षांनंतर सापडले आहे. ही काही चित्रपट किंवा कथा-कादंबरीमधील कथा नाही, प्रत्यक्षात उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी या गावात घडलेली घटना आहे. मंगळसूत्र चोरीला गेले तेव्हा शकुंतलाबाई शिंदे चाळीस वर्षांच्या होत्या.

आता त्यांनी वयाची साठी ओलांडली आहे. २२ वर्षांच्या या लढ्यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पतीची. उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी गावच्या शकुंतलाबाई शिंदे या १९९८ मध्ये पतीबरोंबर येरमाळा येथील येडश्वरी यात्रेला गेल्या यात्रेच्या गर्दीत त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी चोरले.

सौभाग्याचं लेणं चोरीला गेल्याने त्या भर यात्रेत ढसाढसा रडल्या. पतीने समजुत घालुन शांत केले त्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली व गावाकडे निघून गेले. तब्बल वर्षभराने पोलीसांनी मुद्देमालासह आरोपीला गजाआड केले. मात्र, त्यानंतर न्यायालयीन तारखा आणि सुनावण्यांमध्ये त्यांचे मंगळसूत्र अडकून पडले.

तेव्हापासून शकुंतला शिंदे हे मंगळसूत्र परत मिळवण्यासाठी लढा देत होत्या. अखेर 13 जुलै 2019 ला हे प्रकरण कोर्टात सुनावणीला आले. तेव्हा न्यायालयाने शकुंतला बाईंचे मंगळसूत्र परत देण्याचा आदेश पोलिसांना दिला. २ मार्च २०२१ रोजी पोलिसांनी हे सोने शकुंतला शिंदे यांना परत दिले. त्यामुळे यंदाचा महिलादिन शकुंतला शिंदे यांच्यासाठी खास ठरला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe