अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- महिलांना सक्षमीकरणाची गरज नसते. ती स्वतःच सक्षम असते. महिलांना प्रथांच्या बोज्याखाली दाबून न ठेवता तीला कर्तृत्व सिध्द करु द्यावे. प्रत्येक महिलेचा सन्मान करणे म्हणजे महिला दिनाचा खरा सेलिब्रेशन आहे. घरातील लहान मुलांवर आईने संस्कार घडविल्यास समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
महिलांनी महिलांना केलेले सहकार्य म्हणजे सक्षमीकरण होय, असे प्रतिपादन जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी केले. अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालय, शहर बार असोसिएशन व महिला वकीलद्वारा संचालित न्यायाधार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांच्या न्याय हक्काविषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश कंक बोलत होत्या.
कौटुंबिक न्यायालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश एन.एस. आणेकर, अहमदनगर शहर बार असोसिएशनच्या सचिव अॅड. मीनाक्षी कराळे, न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अॅड. निर्मला चौधरी आदींसह महिला वकिल उपस्थित होत्या. पुढे बोलताना न्यायाधीश कंक म्हणाल्या की, महिला असो, वा पुरुष सहन महिलांना करावे लागते. महिलांप्रती समाजाची असलेली चुकीची विचारसरणी बदलण्याची गरज आहे. पुरान काळात महिलेला आद्यस्थान दिले होते.
महिलांना नात्यामध्ये अडकवून न ठेवता महिलांनी महिलांचे दु:ख समजून घेतले पाहिजे. सासु आणि सुनेचे नाते सुधारले त्यांनी एकमेकीला आई आणि लेक म्हणून स्विकारल्यास मोठा बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात अॅड. मनीषा केळगंद्रे यांनी महिलांनी कायद्याचे नुसते ज्ञान न घेता, ते अवलंबले पाहिजे. अन्याय, अत्याचार झाल्यास ते सहन न करता कायद्याचा आधार घेऊन आपले हक्क जपण्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. निर्मला चौधरी म्हणाल्या की, न्यायाधार संस्थेमध्ये वृद्ध महिला अडचणी समोर घेऊन येतात. निराधार महिलांना सरकारी योजना आहेत. पण कुटुंबामधील ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही सरकारी योजना नाहीत. वृद्ध आई-वडील मुलांच्या विरुद्ध जात नाही. तक्रारी केल्या व निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी अवघड होते. त्यांच्या सर्व प्रश्नांचा विचार करता न्यायाधार संस्थेने वृद्ध मातापित्यांच्या योजना लागू करण्यासाठी संशोधन करून मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत.
प्रत्येक गावात वृद्धांसाठी वृद्ध मंदिरे बांधण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. वृद्धांना त्यांच्या गावांमध्ये सर्व राहण्याची, खाण्याची व औषधोपचाराची सोय व्हावी यासाठी सर्वांनी मिळून पाठपुरावा केला तर नक्कीच त्यांची सोय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर कालानुरूप कायद्याचा वापर करून सर्व स्तरातील महिलांना आधार देण्याची गरज बोलून दाखवली.
न्यायाधीश एन.एस. आणेकर म्हणाल्या की, वृद्धांना दया, सहानुभूती देण्यापेक्षा त्यांना कामाच्या अनुभवावरून काम दिल्यास रोजगार उपलब्ध होऊन त्यांना सन्मानाने जगता येणार आहे. पीडितेला मनोधैर्य योजनेतून काही प्रमाणात मदत मिळते. मात्र मुल सांभाळ न करणार्या वृध्दांचे हाल होतात. समाजाने याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहिणी नगरकर यांनी महिला दिनावर आधारित बहारदार कविता व गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. वृषाली तांदळे यांनी केले. आभार अॅड. अनिता दिघे यांनी मानले. यावेळी न्यायाधार संस्थेच्या सचिव अॅड. नीलिमा भणगे-दंडवते, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक सुषमा बिडवे, अॅड. दिक्षा बनसोडे, अॅड. अनुराधा येवले, अॅड. निरुपमा काकडे, शकुंतला लोखंडे, सुमन काळापहाड, गौतमी भिंगारदिवे, रजनी ताठे, शबाना शेख, अॅड. खेडकर आदी उपस्थित होत्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|