राहुरी : नगर-मनमाड राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग (एमएच १६०) म्हणून केंद्र सरकारने २२ मार्च २०१३ मध्ये राजपत्रात घोषीत केल्यानंतर आजअखेर ह्या रस्त्याचे रुपांतर करण्यात आले नाही. सदर राज्य मार्गाचे लवकरच राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आमदार तनपुरे पुढे म्हटले आहे की, नगर-मनमाड राज्य मार्ग हा दक्षिण भारत व उत्तर भारताला जोडणारा महत्वाचा राज्य मार्ग आहे. ह्या मार्गावर शिर्डी, शिंगणापूर सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अनेक साखर कारखाने, बाजार समितींचे सर्व दळणवळण याच राज्य मार्गावरून होत असल्याने सदर रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणावर वाहतूक होते.
सदर रस्त्याचा आराखडा करताना प्रतिदिन २० टन क्षमतेची वाहनाची वाहतूक ग्राह्य धरून केला होता. आज प्रत्यक्षात या रस्त्यावरून १०० टनी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या वहानांची वाहतूक होत असल्याने रस्ता कायम खराब होत आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या रस्त्याचे काम बांधा वापरा हस्तांतरित करा ह्या तत्वावर सुप्रीम कंस्ट्रक्शन ह्या एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. सदर कंपनीने नगर, कोल्हार ह्या मार्गाचे काम पहाताना त्यांनी देहरे येथे टोल वसूली नाका सुरु केला होता.
सदर कंपनीची मुदत ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपल्याने या रस्त्याचे मुदत संपताच राष्ट्रीय महामार्ग म्हणून हस्तांतरण करणे गरजेचे होते. सदर रस्ता रुपांतरण करताना अनेक कारणे देत सदर रुपांतर लांबणीवर टाकत आजपर्यंत प्रलंबित पडला आहे.
राष्ट्रीय महामार्गासाठी सहा पदरी रस्त्याची जरी अट असली तरी सध्याचा नगर-मनमाड राज्य मार्ग हा चौपदरी असून तो राष्ट्रीय महामार्गा योग्य असल्याचे समजते.