ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली, यासाठी केंद्रातील भाजपचे सरकारच कारणीभूत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-जेथे सर्वसामान्य लोकांना रेमडेसिविरचे एक इंजेक्शन मिळविण्यासाठी नाकीनऊ येतात, तेथेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कोठून?’ असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला.

‘आज सर्वसामान्यांवर ऑक्सिजनसाठी सोनं विकण्याची वेळ आली असून यासाठी केंद्रातील भाजपचे सरकारच कारणीभूत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

कोरोनाचा वाढता उद्रेक आणि रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तांबे बोलत होते. यावेळी अकोलेचे आमदार किरण लहामटे, अहमदनगर जिल्हापरिषद काँग्रेस गटनेते अजय फटांगरे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तांबे म्हणाले, ‘सध्या करोनामुळे आरोग्याची स्थितीत गंभीर बनली आहे. सामान्य माणसांची उपचारासाठी धावपळ सुरू आहे. सोनं विकून ऑक्सिजन घेण्याची वेळ आली आहे, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारच जबाबदार आहे.

केवळ सामान्यच नव्हे तर श्रीमंत लोकांचेही हाल सुरू आहेत. अशा वाईट काळातही भारतीय जनता पक्षाचे नेते राजकारण करीत आहेत. अशीच एक घटना काल रात्री मुंबईत पहायला मिळाली.

रेमडेसिविरच्या साठ हजार इंजेक्शनचा साठा लपवून ठेवलेल्या एका कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर त्याच्या सुटकेसाठी पोलिस स्टेशनला धावत आहे.

ही इंजेक्शन त्यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी ठेवली होती. हे इंजेक्शन राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी कंपनीच्या मालकावर दबाव आणला जात होता.

हे पोलिसांना कळाल्यावर पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आल्यावर भाजपचे नेते सुटकेसाठी तेथे धावत आले.

जेथे सामान्य माणसाला एक इंजेक्शन मिळणे अवघड आहे, अशा वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कशी? हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण असून त्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचे तांबे यांनी म्हंटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe