रेमडेसिवीर प्रकरण सुजय विखेंना भोवणार; न्यायालयाने दिले हे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाची मोठी आकडेवारी दररोज दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात अनेक वैद्यकीय सेवांचा अभाव आहे.

यातच कोरोना रुग्नांसाठी महत्वपूर्ण असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा आहे. यातच नगरचे खासदार सुजय विखे यांनी हवाई दौरा करत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये आणला होता.

आता याच प्रकरणावरून सुजय विखे अडचणीत आले आहे.रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनावर नाराजी व्यक्त करतानाच शिर्डी विमानतळावरील 10 ते 25 एप्रिल 2021 या काळातील खाजगी विमान वाहतुक

व मालवाहतुकीचे सर्व फुटेज व नोंदी जतन करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. दिल्ली येथून मित्राच्या मदतीने रेमडेसिवीरचा साठा हवाईमार्गे आणून जिल्ह्यातील करोना रूग्णांना वितरीत केल्याचा दावा खा.डॉ.विखे यांनी केला होता.

या दाव्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केेले. याप्रकरणी अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी झाली.

यावेळी न्या.आर.व्ही.घुगे व न्या. बी.यू. देबडवार यांनी गंभीर निरिक्षणे नोंदविली. नगर जिल्हाधिकार्‍यांनी सरकारी वकीलांमार्फत 28 एप्रिल 2021 चा अहवाल न्यायालयात सादर केला.

जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने नगर जिल्हा शल्यचिकित्सकांनी विखे मेडिकल स्टोअरकडून मिळालेल्या पैशातून पुणे येथील फार्माडी कंपनीकडून रेमडेसिवीर खरेदी केली व त्यातील काही साठा जिल्हा शल्यचिकित्सकांंनी विखे मेडिकल स्टोअर दिला.

हा साठा 1700 रेमडेसिवीर इंजेक्शनचा होता. जिल्हाधिकार्‍यांनी अहवालात नमूद केलेला साठा दिल्ली येथून शिर्डी येथे आलेला नव्हता.

त्यावरून नगर जिल्हाधिकारी खासदार विखे यांना पाठीशी घालत आहेत, असे गंभीर निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सरकारी वकीलांनी जिल्हाधिकार्‍यांना बाजू मांडण्यासाठी 3 दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यानुसार पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe